मंत्र्यांच्या बंगल्यांत 15 मिनिटांचा ब्लॅक आऊट

मंत्र्यांच्या बंगल्यांत 15 मिनिटांचा ब्लॅक आऊट

कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे देशभरातील जनतेवर लोडशेडींगचे संकट आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागातील बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच, मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल झाली होती. त्यानंतर आता मंत्रालय परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गुल झाल्याचे समोर आले. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे बंगल्यात 15 मिनिटांचा ब्लॅक आऊट झाल्याचे पाहायला मिळाले

मंगळवारी सकाळी व संध्याकाळी मंत्रालय परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या वीज विभागाच्या रिसिव्हिंग स्टेशनमध्ये दोन वेळा फॉल्ट झाल्याने बत्ती गुल झाल्याचे स्पष्टीकरण बेस्टकडून देण्यात आले आहे. उन्हाळ्यात मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोळशाची कमतरता भासत आहे.

राज्यातील जनतेला काही ग्रामीण भागात वीज भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. मात्र मुंबईत विशेषतः शहर भागात टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करून माफक दरात मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत बेस्ट उपक्रमाचे चांगले नाव आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अचानक बत्ती गुल झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे एका कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोशयारी असताना बत्ती गुल होण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गुल झाल्याने कदाचित बेस्ट उपक्रमाला जाब मंत्र्यांकडून विचारला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

रिसिव्हिंग स्टेशनमध्ये फॉल्ट 

मंगळवारी सकाळी 10 वाजता मरीन ड्राइव्ह रिसिव्हिंग स्टेशनला पहिला फॉल्ट झाला होता. तो दुरुस्त करण्यात आला. मात्र त्यानंतर दुसरा फॉल्ट संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आला. साधारणपणे दीड तासात संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यात अंधार पसरला होता. मात्र बेस्टच्या वीज विभागाच्या अधिकाऱयांनी तात्काळ वीज दुरुस्तीबाबतची कामे हाती घेतली. त्यामुळे 60 ते 70 टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असून उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘बेस्ट’च्या मिनी बस चालकांचे कामबंद आंदोलन

First Published on: May 17, 2022 8:40 PM
Exit mobile version