‘एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी करा’; आंबेडकर आणि गोऱ्हेंची मागणी

‘एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी करा’; आंबेडकर आणि गोऱ्हेंची मागणी

'एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी करा' प्रकाश आंबेडकर आणि नीलम गोऱ्हेंची मागणी

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ४ मुख्य आरोपींचा आज सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्याच ठिकाणी गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस या ४ आरोपींना घेऊन गेले होते. मात्र तपास सुरु असताना या आरेपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला मात्र, ते हातात आले नाही आणि पोलिसांना नाईलाजास्त त्यांच्यावर गोळीबार करावा लागला ज्यात त्या चौघांचा मृत्यू झाला. देशभरातून पोलिसांचे कौतुक होत असताना काही नेत्यांनी एन्काऊंटवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हंटलं की एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी झाली पाहीजे. पोलीस जरी आता लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याची काही प्रक्रिया असते जी ओलांडता येत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. फास्ट ट्रॅक कोर्टात या घटनेची सुनावणी १ ते २ महिन्यात करून निर्णय घेता आला असता. आरोपीला अशाप्रकारे संपवणं योग्य नाही, असं देखील ते पुढे म्हणाले.

काय म्हणाल्या डॉ. नीलम गोऱ्हे?

शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका निर्माण होते. एन्काऊंटर नेमकं केले की घडवले? याबद्दल चौकशी झाली पाहिजे. सीआयडी किंवा सीबीआयकडून ही चौकशी झाली पाहिजे. हा मार्ग निवडल्यामुळे पुरावे नष्ट केले जातात, चौकशी होत नाही. आरोपी खरे आहे की खोटे? हा देखील प्रश्न निर्माण होतो. तर या पोलिसांवर ताबडतोब चौकशी करण्याची मागणी शिवनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

जरी अनेक लोकांना आरोपींचा एन्काऊंटरवर आनंद व्यक्त केला असला तरी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर हे बरोबर आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.


हेही वाचा: हैदराबाद बलात्कार प्रकरण: पोलिसांनी केलं ते कायद्याला धरुन नव्हतं – उज्ज्वल निकम

 

First Published on: December 6, 2019 11:50 AM
Exit mobile version