प्रकाश आंबेडकरांची घोषणा : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार

प्रकाश आंबेडकरांची घोषणा : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार

भाजप 'ब्लॅकमेलींगचे सरकार'; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारिप महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात भारिप आणि काँग्रेसमध्ये मतभेद सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी काँग्रेसजवळ १२ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जागा वाटपासंदर्भात घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी दिला होता इशारा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रसेकडे १२ जागांवर निवडणुक लढविण्याची मागणी केली होती. ‘ही मागणी मान्य झाली नाही, तर भारिप महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल’, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि भारिपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही, असे देखील स्पष्ट केले होते. परंतु, काँग्रेसकडून अद्यापही जागांचा प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोका

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसू शकतो. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली आहे. ही आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपविरोधातील मतांमध्ये यामुळे विभागणी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

First Published on: February 3, 2019 7:45 PM
Exit mobile version