जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं आहे – प्रकाश आंबेडकर

जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं आहे – प्रकाश आंबेडकर

आताच्या काळात धर्माचं भांडण सुरू झालेलं नाही. परंतु जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असं आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही भुमिका घेऊ, मात्र मतदारांनी काय पाहिजे हे ठरवलं पाहिजे. इथल्या प्रत्येक माणसाने लोकशाही पाहीजे की हुकुमशाही हे ठरवलं पाहीजे, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचं उद्धाटन करण्यात आलं. या संकेतस्थळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन करण्यात आलं आहे. त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला, तो नाकारला. समता बंधूभाव आणि एकमेकांवर आपुलकी निर्माण कशी होईल यावर लिखान केलं. आताच्या काळात धर्माचं भांडण सुरू झालेलं नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं भांडण सुरु आहे.

एका बाजूला वैदिक परंपरा आणि दुसरी संतांची परंपरा उभी आहे. एका बाजूला विवाह आणि दुसऱ्या बाजूला पुनर्विवाह असा भाग आहे. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा तर संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारा, त्यामुळे लोकांनी काय निवडायचं ते ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. धर्म आवश्यक आहे, पण त्याच्या अधिन जाऊ नये असा त्यांचा समज होता. त्याचं धर्माशी भांडण नव्हतं, तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला म्हणून राष्ट्र म्हणून उभं राहू शकलो नाही, असंही आंबेडकर म्हणाले.


हेही वाचा : न्याययंत्रणा तुम्ही बुडाखाली घेणार असाल तर… उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे


 

First Published on: November 20, 2022 10:22 PM
Exit mobile version