राज्य सरकारचं टास्क फोर्स नेमकं करतंय तरी काय?; दरेकरांचा सवाल

राज्य सरकारचं टास्क फोर्स नेमकं करतंय तरी काय?; दरेकरांचा सवाल

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने ठिकठिकाणी रुग्णांना बेड्स, महत्त्वाची औषधं मिळत नाही आहेत. यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याच्या टास्क फोर्सवर सवाल उपस्थित केले आहेत. राज्य सरकारचं टास्क फोर्स केवळ बैठका घेण्यासाठी आहे की काय, हेच काही कळत नाही आहे, असं दरेकर म्हणाले. राज्य सरकारचं टास्क फोर्स नेमकं करतंय तरी काय? असा सवाल दरेकरांनी केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी सरकार आरोग्य व्यवस्था वाढवा, अशी विनंती केली. सरकारचं टास्क फोर्स नेमकं करतंय तरी काय? हेच कळत नाही आहे. केवळ बैठका घेणं, कागद नाचवणं एवढच काम टास्क फोर्स करतेय. पुढील १५ दिवसात काय लागणार आहे याचा साठा करण्याची आवश्यकता आहे, असं दरेकर म्हणाले. रुग्णांना आजही बेड्स, व्हेंटीलेटर, आयसीयू बेड्स मिळत नाही आहेत.

राज्यात रेमडेसिवीर उपलब्ध नाही. रेमडेसिवीरसाठी आम्ही दमणला जाऊन आलो. शासकीय परवान्यासाठी जी शासकीय हालचाल करायला हवी ती केली जात नाही आहे. शासनाने आत गतीने काम करायला हवं. कारण आता सगळं हाताबाहेर गेलं आहे. आपण कशाचीच हमी देऊ शकत नाही, असं आरोग्य यंत्रणेचं चित्र आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन लावलं जात आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, मनुष्य बळ वाढवा, यंत्रणा वाढवा. वाटेल तेवढा खर्च करा, आमचं काहीही म्हणणं नाही. या ठिकाणी शेकडो जीव जात आहेत. ते जीव वाचवा, हीच सरकारला विनंती, असं दरेकर म्हणाले.

 

 

First Published on: April 13, 2021 12:19 PM
Exit mobile version