ईडीचा दावा : अलिबागमधील १० भूखंडांच्या खरेदीसाठी प्रवीण राऊतांनी दिले संजय राऊतांना ३ कोटी!

ईडीचा दावा :  अलिबागमधील १० भूखंडांच्या खरेदीसाठी प्रवीण राऊतांनी दिले संजय राऊतांना ३ कोटी!

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तब्बल ३ कोटी रुपये रोख देऊन १० भूखंड खरेदी केल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केले आहे. मनी लॉण्ड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीने नोंदवलेल्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना रविवारी अटक करण्यात आली.

गोरेगाव उपनगरातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित गैरव्यवहारातून राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली असल्याचा दावा ईडीने सोमवारी पीएमएलए न्यायालयात केला, असे ‘इडिया टुडे’ने म्हटले आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या व्यवहारातून मिळालेले हे पैसे अलिबागच्या किहीम बीच येथी १० भूखंड खरेदीसाठी वापरण्यात आले. ही रोख रक्कम मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शनचा संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांनी दिले, असेही ईडीने म्हटले आहे.

संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत असून ईडीने मंगळवारी या प्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचे निवासस्थान आणि कंपनीशी संबंधित आणखी एक परिसराची ईडीने झाडाझडती घेतली. त्या व्यक्तीला ईडीच्या कार्यालयात नेऊन त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. तर, दुसऱ्या छाप्यात काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळवलेला पैसा विविध कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळवला गेला तसेच प्रवीण राऊतने रोखीच्या स्वरुपात संजय राऊत यांच्याकडे वळवला, असे ईडीने आपल्या रिमांड अहवालात म्हटले आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दर महिन्याला मोठी रक्कम मिळत होती. प्रवीण राऊत यांनी राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे वळवलेले १.०६ कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडले. प्रवीण राऊतला पुढे ठेवून संजय राऊत सूत्रे हलवित होता, असा दावा ईडीने केला आहे.

संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी संगनमत करून या प्रकल्पातून पैसे काढून घेण्याचा कट रचला, असा आऱोप ईडीने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत आणखी काही जणांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

First Published on: August 4, 2022 9:13 AM
Exit mobile version