मुंबईतील सहा किल्ल्यांचे संवर्धन

मुंबईतील सहा किल्ल्यांचे संवर्धन

मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा सहा किल्ल्यांचे लवकरच संवर्धन होणार असून या किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्याची सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी दिल्या.

संरक्षित किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्व, वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत असली तरीही वित्त विषयक तज्ज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी, अशी सूचनाही देशमुख यांनी केली. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील गड- किल्ल्यांसंदर्भातील आढावा बैठक पार पडली. यावेळी मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करीत असताना तो एकत्रितपणे तयार करण्याची सूचना देशमुख यांनी केली.

याशिवाय राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण ६० किल्ल्यांचा विकास आाराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसात सादर करावेत. लातूर जिल्ह्यातील औसा आणि उदगीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच राज्यातील १8 संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची काय कामे करण्यात येत आहेत. याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्याचे निर्देशही देशमुख यांनी दिले.

First Published on: October 6, 2021 6:35 AM
Exit mobile version