राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतीपिकांना मोठा फटका

राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतीपिकांना मोठा फटका

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली असल्यामुळे शेतीपिकांचे (crops) मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे.

राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. त्यामुळे कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे, तर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. शहरासह नवापूर, शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खांडबारा रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसात ही परिस्थिती आहे, तर पावसाळ्यात काय परिस्थिती राहणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक पडला आहे. गेल्या 4 वर्षापासून रेल्वे बोगद्याचे काम सुरु असल्यामुळे कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासन बोगद्याचे काम करत आहे, पण काम पूर्ण न झाल्यामुळे या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे खड्ड्याचे रुपांतर तलावात झाले आहे.

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे मंडप कोसळले
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील दापका राजा येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक गुरु आणि अन्य मान्यवर येण्यापूर्वी येथे वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने मंडप कोसळ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडप कोसळला त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते, मात्र कोणतीही हानी झाली नाही. मंडप कोसळ्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला.

लग्न छत्रीखाली लावण्याची वेळ
हिंगोली जिल्ह्यातील वाकोडी इथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, मात्र लग्न मुहुर्ताच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नवरा नवरीचे लग्न छत्रीखाली लावण्याची वेळ आली. वाकोडी येथे वानखेडे आणि घोलप परिवारातील लग्नसमारंभ पावसाने मुहुर्तावर हजेरी लावली असली तरी लग्न उरकणे गरजेचे असल्यामुळे गावकऱ्यांनी भन्नाट आयडिया शोधत नवरा नवरीचे लग्न छत्री खाली लावले.

First Published on: May 5, 2023 8:06 AM
Exit mobile version