पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांना जळगावातून सुरूवात

पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांना जळगावातून सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपाच्या उमेदवारी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: महाराष्ट्रात एकूण ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा १३ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे. त्याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथेही मोदींची सभा होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला, पनवेल आणि परतूर येथे सभा होणार आहेत. तर १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळी येथे सभा घेतल्या जाणार असून १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मोदी यांच्या प्रचार दौर्‍याची सांगता होणार आहे.

‘काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकर्‍यांना पीक विम्यापोटी साडे सात हजार कोटी एवढी नुकसान भरपाई मिळाली. फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्‍यांना २१ हजार ९५० कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना २५ हजार कोटींची कर्जमाफी दिली.

तर गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही, एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात जनतेने सुखी, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र अनुभवला’, असल्याचे वक्तव्य स्मृती इराणी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला भाजप राष्ट्रीय माध्यम विभाग सह प्रमुख संजय मयुख, प्रदेश मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, महिला मोर्चा प्रदेश प्रमुख माधवीताई नाईक, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके आदी उपस्थित होते.

First Published on: October 12, 2019 6:25 AM
Exit mobile version