दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न

दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा कोरोनाने मृत्यू झाला असून ही बाब लपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बालकाच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवसांनी पालिकेकडे या मृत्यूची माहिती आली असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयाला नोटीस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; संबंधित बालकाला उपचारासाठी ३ जून रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. स्वॅब तपासणीनंतर बालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या बाळावर कोरोनाचे उपचारही सुरु होते. मात्र, ७ जून रोजी या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात १३ जूनपर्यंत आरोग्य विभागाला कल्पनाच नव्हती. महापालिकेकडून दररोज नवीन कोरोना रुग्णांची, कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि उपचारानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची माहिती पुणे महानगरपालिकेकडे पाठवली जाते. मात्र, गेल्या ७ दिवसांपासून या दोन महिन्याच्या कोरोनाबाधित बाळाच्या मृत्यूची माहिती दिली गेली नाही. अखेर शनिवारी अहवालात बालकाच्या मृत्यूच्या तारखेवरुन ही माहिती समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातील या खासगी रुग्णालयाने ही घटना लपवण्याचा प्रयत्न का केला, यामागे रुग्णालयाचा काय उद्देश होता असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयाला नोटीस बजावणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आता यात हे खासगी रुग्णालय काय उत्तर देणार आणि त्यावर महापालिका काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – ठाकरे सरकार की मेहता सरकार!


First Published on: June 14, 2020 9:21 AM
Exit mobile version