खासगी कार्यालये, दुकाने बंद

खासगी कार्यालये, दुकाने बंद

करोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, खासगी आस्थापने व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हवरून केली. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे, दूध, भाजीपाला इत्यादी दुकाने सुरू असतील. शुक्रवारी 12 वाजेपासून हे आदेश अमलात येणार असून सध्या कालमर्यादा ३१ मार्चपर्यंत आह

बंदच्या बाबतीत या शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या संपर्कात राहावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या आस्थापना, दुकाने बंद करीत आहेत त्यांना माझे आवाहन आहे की, आपला जो कष्टकरी – कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका, कारण त्यांचे हातावर पोट आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वचजण या कामी पुढे आले आहेत त्यांचे मी आभार मानतो.

काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार हे प्रश्न होते आणि म्हणूनच तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलविण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच 50 टक्के कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय घेण्यात आला होता.

आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी
आर्थिक वर्ष 2019-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यात आणखी ४ जण करोना पॉझिटिव्ह

मुंबईत दोघांची प्रकृती गंभीर

राज्यात आणखी चार जणांना करोना विषाणूंची बाधा झाली आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ५२ झाली असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी आढळलेल्या चार रुग्णांपैकी दोन रुग्ण मुंबईतील असून प्रत्येकी एक रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहावे आणि गर्दी टाळावी असे आवाहन शासकीय स्तरावरून वारंवार करण्यात येत आहे.

मुंबईत तुर्कस्थानमधून प्रवास केलेला ३८ वर्षीय तरुण आणि इंग्लंडमधून प्रवास केलेला ६२ वर्षीय पुरुष हे दोघेही शुक्रवारी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर स्कॉटलंडहून आलेला पुण्यातील २० वर्षीय तरुणही करोना बाधित आढळून आला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिफिपिन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आलेला २२ वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळला. त्याच्या संपर्कात आलेला त्याचा २४ वर्षांचा भाऊ शुक्रवारी करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या या ५१ करोना बाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर, ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. राज्यात शुक्रवारी एकूण २८१ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १ हजार ५८६ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईतील सर्व चर्च बंद
करोनाच्या धोक्यानंतर मुंबईतील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळं मुंबई हायकोर्टाने आज नापसंती व्यक्त केली. त्यानंतर आर्च बिशप यांच्यातर्फे येत्या ४ एप्रिलपर्यंत मुंबईतील चर्च बंद ठेवण्याची ग्वाही देण्यात आली.

महापालिकेच्या कर वसुलीत घट
करोनाचा प्रभाव मुंबईतील मालमत्ता कराच्या वसुलीवर झाला आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेकडून केवळ ३९०० कोटी रुपये इतकाच मालमत्ता कर वसूल झाला आहे. करोनामुळे तो वाढण्याची शक्यताही नाही.

एसटीची प्रवासी संख्या घटली
एसटीच्या प्रवासामध्ये करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता.परिणामी एसटी महामंडळाचा प्रवासी संख्येत मोठी घट दिसून आली आहे.

केंद्र सरकारची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन
करोनाबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी ९०१३१५१५१५ या क्रमांकाची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन लॉन्च केली आहे. यात व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइनवर चॅट करून कोणताही यूजर प्रश्न विचारू शकतो. तसेच त्याचे उत्तरही त्याला मिळेल.

ठाणे जिल्ह्यात ३९५ जण देखरेखेखाली तर आठजण पॉजिटीव्ह

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती

ठाणे जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून आतापर्यंत ४६७ पैकी ७२ लोकांना कोरोनाची लागण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे आता ३९५ नागरिक देखरेखेखाली असून जिह्यात कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या ८ असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ठाण्यात १, कल्याणमध्ये ३, उल्हासनगरमंध्ये १, नवी मुंबईत ३ अशी एकूण ८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या उपाय योजनांना आणि सूचनांना ७० ते ८० टक्के नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगत नियमांचे उल्लंघन करू नका असे आवाहन नार्वेकर यांनी नागरिकांना केले आहे.

First Published on: March 21, 2020 6:59 AM
Exit mobile version