उंबरकोंड अंगणवाडी समस्यांच्या विळख्यात

उंबरकोंड अंगणवाडी समस्यांच्या विळख्यात

तालुक्यातील लोहारे उंबरकोंड अंगणवाडी इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने एक लाख निधी दिला. त्यातून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, तीन दरवाजे, फरशी, खिडकीचे केलेले काम तकलादू झालेले आहे. इमारतीच्या भिंतीला तडे, तसेच पत्र्याला चिरा गेल्या आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात या अंगणवाडीचे वर्ग मंदिरात भरत होते. अंगणवाडी सेविकेच्या मदतीला कोणीही नसल्याने विद्यार्थ्यांसाठी लागणारे पाणी स्वतः सेविकेलाच भरून आणावे लागत होते. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकी बांधून अंगणवाडीला नळ जोडणी देण्यात आली आहे. परंतु त्यातून पाणी मात्र येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अंगणवाडीच्या दुरवस्थेबाबत सेविका छबीबाई सकपाळ यांना विचारले असता त्यांनी एक लाखाच्या निधीतून करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले. मूलभूत सुविधांच्या नावानेही सारी बोंब असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात 6 महिने विद्यार्थ्यांचे नुकसान, तसेच त्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी मंदिरात वर्ग भरविण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक माहितीसाठी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही; तर पंचायत समितीमध्ये संपर्क साधला असता वर्षापूर्वी 1 लाख रुपये खर्चून अंगणवाडी दुरुस्ती करण्यात आली आहे. पाण्याची योजना मार्गी लावण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

First Published on: December 1, 2019 2:36 AM
Exit mobile version