MPSC परीक्षा २१ मार्चला होणार, लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धी पत्रक जारी

MPSC परीक्षा २१ मार्चला होणार, लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धी पत्रक जारी

लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक गुरुवारी जारी केले होते. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शनिवारी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जारी करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जारी केले आहे.

MPSC परीक्षा देण्यासाठी राज्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात आणि जिल्हास्तरावर राहायला येत असतात. परंतु ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली असल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. MPSC ची परीक्षा ही येत्या १४ तारखेला घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला घेण्यात येणार असल्याचे सुधारित प्रसिद्धी पत्रक शासनाने जारी केले आहे. परंतु या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षा १४ मार्चला का होऊ शकत नाही असा सवाल परीक्षार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार – मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असे वचन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिले आहे. याबाबत उद्या तारीख घोषित करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा देताना पाणी देणारा, सुपव्हिजन करणारा कर्मचारी हा कोरोना बाधित तर नाही ना अशा दडपणाखाली विद्यार्थी नसायला पाहिजे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केलेला कर्मचारी आणि कोरोना लस घेतलेलाच कर्मचारी परीक्षा घेण्यास उपस्थित राहील अशी सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

First Published on: March 12, 2021 11:23 AM
Exit mobile version