Pune Ambil Odha : आंबिल ओढा प्रकरणात पुणे महापालिकेची चौकशी करा; नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune Ambil Odha : आंबिल ओढा प्रकरणात पुणे महापालिकेची चौकशी करा; नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आंबिल ओढा प्रकरणात पुणे महापालिकेची चौकशी करा; नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऐन पावसाळ्यात पुण्यातील आंबिल ओढा येथे ओढ्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रहिवाशांची घरे पाडण्याच्या पुणे महापालिकेच्या बेकायदेशीर कृतीची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गेल्या महिन्यात आंबिल ओढा येथील बेकायदा घरे पाडण्याची मोहीम पुणे महापालिकेने हाती घेतली होती. या विरोधात आवाज उठताच कारवाई स्थगित करण्यात आली. नितीन राऊत यांनी २९ जून रोजी या वस्तीस भेट देऊन रहिवाशांशी चर्चा केली होती. तसेच मनपा आयुक्तांची भेट घेत कारवाईतील त्रुटींवर बोट ठेवून त्यांना जाबही विचारला होता.

या प्रकरणात पुणे महापालिकेने बेकायदेशीर कारवाई केली का? या कारवाईमागे कुणाला बेकायदेशीर लाभ पुरवण्याचा हेतू होता का? पुणे मनपाची या कारवाईसाठी संमती योग्य होती का? याची चौकशी राज्य सरकारकडून होणे आवश्यक आहे. याशिवाय या वस्तीत राबविण्यात येणाऱ्या एसआए प्रकल्पाची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे, असे नितीन राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ४ जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात म्हणाले.

रहिवाशांची खोटी नावे टाकून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे दाखवून या एसआरए योजनेला बिल्डरने संमती मिळवल्याची तक्रार येथील रहिवाशांची आहे. या तक्रारींची चौकशी होणे गरजेचे आहे. ही कारवाई करताना महिलांशी गैरवर्तन करण्यात आल्याची माहिती मला यावेळी देण्यात आली. याची तात्काळ चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

First Published on: July 7, 2021 9:31 PM
Exit mobile version