कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

पावसांनं राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार हजेरी लावली असली, तरी काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथलं स्थानिक जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापुरात वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पंचगंगा नदीला आलेला पूर, यामुळे रस्तेवाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. शिरोळजवळ पुराचं पाणी थेट पुलावर आल्यामुळे पुणे-बंगलोर महामार्गाची वाहतूक किणी टोलनाक्याजवळच थांबवण्यात आली आहे. तसेच, कोल्हापुरच्या मुख्य दसरा चौकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे कोल्हापूरकर घरातच अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या शाळांना मंगळवारपाठोपाठ बुधवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बाजूच्याच सांगली-साताऱ्यामध्ये देखील कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यामुळे तिथे देखील असंच काहीसं चित्र दिसत आहे.

पुरामुळे गावांचा संपर्क तुटला!

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इथल्या पंचगंगा, कृष्णा, कोयना आणि वारणा या चार प्रमुख नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून या जिल्ह्यांमधून प्रवास करणाऱ्या बाहेरगावच्या प्रवाशांनाही अडकून पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. विशेषत: पुणे ते बंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग देखील याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळेच हा महामार्ग शिरोळजवळ पुराचं पाणी साचलेल्या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, करवीर अशा काही तालुक्यांमध्ये या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र आहे. अनेक गावांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


हेही वाचा – निरागस पाऊस बेईमान राज्यकर्ते अन् लालची नोकरशाह!

तवंदी घाटात दरड कोसळली

दरम्यान, शिरोळजवळील पुलावर पाणी चढण्यासोबतच तवंदी घाटात दरड कोसळल्यामुळे देखील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आसपासच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

First Published on: August 6, 2019 10:34 AM
Exit mobile version