देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरात पुण्याचा सातवा क्रमांक

देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरात पुण्याचा सातवा क्रमांक

पुणे स्थानक

पुणे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे सातवे शहर ठरले आहे. तसेच वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीतही पुण्याचा विसावा क्रमांक आहे. राज्याची राजधानी मुंबई सर्वाधिक वाहतूक कोंडीचे देशातील दुसरे शहर ठरले आहे. तर संथ वाहतुकीत मुंबईचा चौथा क्रमांक आहे. देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहराचा मान बंगळुरू शहराकडे कायम आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील संशोधकांच्या पथकाने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.

दहा शहरांचे केले सर्वेक्षण 

बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, जयपूर, कोइम्बतूर, अहमदाबाद या क्रमांकानुसार देशातील ही दहा शहरं वाहतूक कोंडीत अव्वल आहेत. ही पाहणी करताना संशोधकांनी गुगल मॅपच्या रिअल टाइम डेटाच्या आधारे गुगल सॉफ्टवेअरशी जोडलेल्या लक्षावधी मोबाइलचे डेटा लोकेशन आणि त्याचा वेग याचे विश्लेषण केले. त्या आधारे मोबिलिटी अँड कन्जस्चन इन अर्बन इंडिया हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सर्व निकषांवर आधारीत अहवाल

अहवालात सर्वाधिक वेगवान, सर्वाधिक संथ आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची क्रमवार यादी जाहीर केली आहे. या शिवाय विविध सरकारी पाहणीची आकडेवारी, लोकसंख्या, वेतन, वाहनाची उपलब्धता, येण्या-जाण्याचे सरासरी अंतर, शहरांचा आकार व रस्त्यांचे जाळे हे निकषही विचारात घेतल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

First Published on: November 7, 2018 7:42 PM
Exit mobile version