कोयता गॅंगला संपवण्यासाठी पोलिसांची नवी आयडिया! आता नवीन नियम लागू

कोयता गॅंगला संपवण्यासाठी पोलिसांची नवी आयडिया! आता नवीन नियम लागू

अखेर आता पुणे पोलिसांनी कोयता गॅंगला पकडण्यासठी कंबर कसलीय. कोयता गॅंगवर आळा घालण्यासाठी आता पुणे पोलिसांनी नवा नियम लागू केलाय.

गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील हडपसर, मांजरी, सिंहगड रोड, नाना पेठ आणि स्वारगेट या भागांमध्ये कोयता गँगनं धुमाकूळ घातलेला आहे. मध्यरात्री वाहनांवर आणि निष्पाप नागरिकांवर कोयत्यानं वार करून फरार होणाऱ्या टवाळखोर तरुणांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून स्पेशल ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. तरी देखील शहरातील कोयता हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. अखेर आता पुणे पोलिसांनी कोयता गॅंगला पकडण्यासठी कंबर कसलीय. कोयता गॅंगवर आळा घालण्यासाठी आता पुणे पोलिसांनी नवा नियम लागू केलाय. त्यामुळे कोयता गॅंगचं काही खरं नाही, असंच प्रत्येक जण बोलू लागलाय.

पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी हा नियम काढला आहे. पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात कोयता खरेदीसाठी आधार कार्ड द्यावं लागणार आहे. यात कोयता कुणी विकत घेतला याची माहिती पोलिसांना मिळणार आहे.

या निर्णयाबाबत पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले की, आम्ही शहरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या सूचना कृषी अवजारांच्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोयत्यासारखी अवजारे केवळ शेती व इतर वैध कारणांसाठीच खरेदी केली जाताय ना, याचीही विक्रेत्यांनी खबरदारी बाळगावी व अल्पवयीन मुलांना कोयता विक्री करु नये, अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत.

कोयत्यासोबतच टवाळखोर गुंडगिरीसाठी बिलहूकचा सुद्दा वापर करत असल्याचं दिसून आलं. म्हणून कोयत्यासोबतच बिलहूकची विक्री करतानाही विक्रेत्यांनी हीच खबरदारी बाळगावी, असं आवाहन अमोल झेंडे यांनी केलंय.

खरंतर पुणे शहरापुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खरेदी करण्याऐवजी गुंड ग्रामीण भागात जाऊन खरेदी करू शकतील. त्यामुळे शहरात अटी घालून कोयता गॅंगवर आळा घालता येईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

First Published on: February 2, 2023 7:16 PM
Exit mobile version