पुणे- नाशिक प्रवास पावणेदोन तासात होणार पूर्ण

पुणे- नाशिक प्रवास पावणेदोन तासात होणार पूर्ण

पुणे- नाशिक प्रवास पावणेदोन तासात होणार पूर्ण

पुणे – नाशिक या दोन शहरातील प्रवास पावणेदोन तासात पूर्ण करणारा बहुचर्चित ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. या रेल्वे प्रकल्पात चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

आज मंत्रालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना पवार यांनी प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली.

पुणे – नाशिक  दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. शिवाय रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असल्याचे पवार म्हणाले.

बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील तसेच संबंधित जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते.

पुणे- नाशिक रेल्वे प्रकल्प

First Published on: August 4, 2020 10:14 PM
Exit mobile version