पुण्यात पुन्हा पुतळावाद; संभाजी महाराजांचा पुतळा हटवला

पुण्यात पुन्हा पुतळावाद; संभाजी महाराजांचा पुतळा हटवला

पुण्याच्या संभाजी उद्यानामध्ये मध्यरात्री स्वाभिमानी संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले याने संभाजी महाराजांचा पुतळा लावला होता. हा पुतळा पोलिसांनी हटवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जंगली रोडवरील संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी की संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन वाद सुरु आहे. दरम्यान स्वाभिमानी संघटनेचा खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. यावर पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या चौथाऱ्याला गणेश कारले याने एक भित्तिपत्रक बांधले आहे. त्यामध्ये हा पुतळा कोणी काढला तर महाराष्ट्र पेटेल आणि उद्रेक होईल, अशी धमकी त्याने दिली आहे. त्यामुळे पुन्हा पुतळावाद सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यात पुन्हा पुतळावाद सुरु होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील संभाजी उद्यानामधील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करुन तो पुतळा हटवला होता. त्यानंतर पुन्हा तिथे गडकरींचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात येत होती. तर काही संघटनांनी गडकरींचा पुतळा बसवण्यात विरोध केला होता. गडकरींनी एका नाटकामधून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गडकरींचा पुतळा हटवला होता. तेव्हापासून अद्यापही हा पुतळावाद संपलेला नाही. हा वाद संपण्याच्याऐवजी पुन्हा पेटण्याची अपेक्षा आहे.


हेही वाचा –संभाजी महाराज दारूच्या कैफेत; ‘त्या’ पुस्तकावर अखेर बंदी

First Published on: February 19, 2019 9:52 AM
Exit mobile version