पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना एक तासआधी पोहोचावे लागणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना एक तासआधी पोहोचावे लागणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

पुणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे स्थानकातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकात तासभर आधीच पोहोचावे लागणार आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. कारण पुणे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून ‘चेन पुलिंग’च्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढीमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. (pune railway administration appeals to passengers to reach at least an hour before scheduled train departure)

पुण्यात रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून, या कोंडीत अनेक प्रवाशांना तासंतास अडकून राहावे लागते. अशीच वाहतूक कोंडी पुणे रेल्वे स्थानक परिसरातही होते. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर येण्यास उशीर होतो. परिणामी प्रवाशांचे नातेवाईक रेल्वेच्या डब्यात असणारी साखळी ओढतात. त्यामुळे रेल्वे गाडी स्थानकावरच थांबवली जाते. या सगळ्यात रेल्वेला स्थानकावरून निघण्यास उशीर होतो. याचाच फटका रेल्वेला बसत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यास लागणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या वेळेच्या एक तासआधी स्थानकावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करायचा असले तर प्रवाशांनी विमानतळाप्रमाने रेल्वेच्या नियोजित वेळेआधी तासभर आधी रेल्वे स्थानकावर पोहचावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

या संदर्भात “पुण्यात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येताना स्थानकावर एक तास आधी पोहचावे. या साठी त्यांनी त्यांचे घर आणि स्थानक यांच्यातील अंतर याचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे आणि गाडी सुटण्याच्या एक तास आधी स्थानकावर पोहोचावे”, अशी माहिती पुणे रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

दरम्यान, चैन ओढल्याने आतापर्यंत अनेक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या वर्षी चेन ओढण्याच्या तब्बल ११६४ घटना या उघडकीस आल्या आहेत. त्यातील ९१४ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


हेही वाचा – मविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा

First Published on: December 16, 2022 3:10 PM
Exit mobile version