Corona: पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय

Corona: पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय

पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय

राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा सण-उत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. दरम्यान दरवर्षी भव्यदिव्य देखाव्यात पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईची मुर्ती विराजमान होते. हा देखावा पाहण्यासाठी पुण्यासह इतर राज्यातील लोकांची गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदाचा गणेशोत्सव मंदिरात साजरा केला जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या १२७ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदा खंड पडला आहे.

यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेश भक्तांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून मंदिराबाहेरून गणेश भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. शिवाय बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनावर भर दिला जाणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. तसेच दरवर्षी गणेश भक्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी हार, फुले नारळ आणि पेढे घेऊन येतात. परंतु यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नाही, असे श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था

दरम्यान दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी भाविकांच्या हस्ते होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. पण यासाठी भाविकांना नाव आणि गोत्र याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. मग गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी दहा दिवसांमध्ये होणारे कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत. भाविकांना लांबून दर्शन देण्यासाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मंदिरात आणि परिसरात ६० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.


हेही वाचा – वाढीव बिलासाठी रुग्णालयाने अडवलं; सेनेच्या नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना थेट उचलून आणलं!


 

First Published on: August 10, 2020 3:00 PM
Exit mobile version