400 डॉलरसाठी MPSC परीक्षेच्या हॉल तिकीटाचा डाटा हॅक; हॅकरला पुण्यातून अटक

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वेबसाईट हॅक करून त्यावर टाकण्यात आलेले संयुक्त पूर्व परीक्षेचे तब्बल 94195 हॉल तिकीट बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून टेलिग्राम चॅनलवर बेकायदेशीररीत्या प्रसारीत करणाऱ्या हॅकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्या हॅक करण्यासाठी तब्बल 400 डॉलरची सुपारी मिळाल्याचे समजते.

नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून रोहित दत्तात्रय कांबळे (19) या तरुणाला अटक केली आहे. रोहित कांबळे डार्कनेट वरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे पोलिसात समोर आले आहे. त्याला एमपीएसीच्या वेबसाईट वरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल 400 डॉलरची सुपारी मिळाल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. (Pune Hacker arrested for MPSC Exam Hall Ticket Data Hack for $400)

एमपीएससी गट ‘ब’ आणि गट ‘क च्या संयुक्त पूर्व परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आयोगाने 28 एप्रिल रोजी आपल्या वेबसाईटवर टाकले होते. सदरचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्राप्त करणे सोपे जावे यासाठी बाह्यलिंकद्वारे आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्या होत्या, मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत रोहित कांबळे या हॅकरने आयोगाच्या वेबसाईटवर बेकायदेशीररीत्या प्रवेश केला आणि त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त केली. यावेळी त्याने तब्बल 94195 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड केले. त्यानंतर त्याने एमपीएससी 2023 ए या टेलिग्राम चॅनलवर आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला हॉल तिकीटचा डाटा बेकायदेशीरीत्या प्रसारीत केला. या प्रकारानंतर एमपीएसीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांना हा सर्व प्रकार समजल्यावर त्यांनी तात्काळ नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाला गंभीररित्या घेत तपासाला सुरुवात केली. सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करताना हॅकरने वापरलेल्या आय पी ॲड्रेस शोध घेतला. या तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटील नगर येथून बुधवारी (24 मे) अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रोहित कांबळेच्या घरातून सदर गुन्ह्यात वापरलेले डेस्कटॉप, लॅपटॉप, 3 मोबाईल फोन आणि एक इंटरनेट राउटर जप्त केले आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, पोलीस चौकशीत रोहित कांबळे याने त्याच्या साथीदारासह हॉल तिकीट बेकायदेशीररित्या डाऊनलोड केल्याचे कबूल केले आहे. त्यांनी सांगितले की, रोहितने डार्क नेट वरील साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्यात येत  आहे. न्यायालयाने रोहितला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे.

First Published on: May 25, 2023 8:32 PM
Exit mobile version