Shirur Lok Sabha: अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार; बारामतीप्रमाणेच शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार; बारामतीप्रमाणेच शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम

शिरुर: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शिरुर हा लोकसभा मतदार संघही प्रतिष्ठेचा झाला आहे. या मतदारसंघात आपलाच माणूस निवडून येणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे जनमानसात ओळखीचा असणारा चेहरा अमोल कोल्हे बाजी मारणार की अजित पवारांनी दिलेला शब्द खरा ठरणार, यामुळे ही लोकसभेची जागा प्रतिष्ठेची तर झालीच आहे, पण सोबत जनतेलाही उत्सुकता आहे. (Shirur Lok Sabha Election 2024 confusion from trumpet Tutari sign against Amol Kolhe )

अशातच, आता अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. बारामतीप्रमाणेच आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्हं मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढलं आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रॅम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून ब्रँड वादनात त्याचा समावेश होते. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असं करण्यात आलं आहे.

अमोल कोल्हेंना बसणार फटका

शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तुतारी चिन्हांवरून जो काही संभ्रम होत आहे, याचा फटका अमोल कोल्हेंना बसणार का हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईलच.

वाडेकरांची प्रतिक्रिया पण अमोल कोल्हे गप्पच

याप्रकरणी शिरुर मतदार संघातील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रकरणी मला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. विरोधी पक्ष उमेदवाराला म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. या चिन्हामध्ये मतदारांची दिशाभूल होणार नाही. परंतु या चिन्हाचा माझ्या उमेदवारीवर फरक पडू शकतो, असं मत मनोहर वाडेकर यांनी व्यक्त केलं.

परंतु, याप्रकरणी अद्याप खासदार अमोल कोल्हेंकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आता अमोल कोल्हे हेदेखील बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळेंप्रमाणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? हे पाहावं लागेल.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करतोय काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 30, 2024 9:49 AM
Exit mobile version