VBA : वंचितच्या उमेदवारांचा माघार घेण्याचा सिलसिला कायम; सोलापूरनंतर या जिल्ह्यातही उमेदवाराची माघार

VBA : वंचितच्या उमेदवारांचा माघार घेण्याचा सिलसिला कायम; सोलापूरनंतर या जिल्ह्यातही उमेदवाराची माघार

पुणे – वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे चा मार्ग निवडला आहे. राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत आतापर्यंत 30 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलण्याचीही वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. तर काही ठिकाणी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांनी निवडून येण्याची शक्यता दिसत नसल्याचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोलापूरमध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी माघार घेतली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील उमेदवारानेही निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या उमेदवारीचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असे सांगत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. यामुळे वंचित सोलापूरमध्ये नवा उमेदवार देणार की, नागपूर आणि कोल्हापूर प्रमाणेच सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले नाही.

जळगावमध्ये निवडून येण्याची शक्यता नाही – प्रफुल्ल लोढा

जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही यासंबंधीची माहिती दिली असल्याचे लोढा यांनी सांगितले आहे. प्रफुल्ल लोढा म्हणाले की, मतदारसंघातील परिस्थिती पाहिली असता, वंचितचा विजय होणार नाही हे लक्षात आल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत आहे.

प्रफुल्ल लोढा यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असे त्यांना विचारले असता लोढा म्हणाले की, कोणाचाही माझ्यावर दबाव नाही. मी कोणाच्या दबावात देखील येणारा नाही. माझ्या मनाला जे वाटले तो निर्णय मी घेतला आहे. माझ्या लक्षात आले की आपण जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्यामुळेच माघार घेतली आहे.

सोलापूर आणि जळगाव मधील उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार किंवा पक्षा कोणाला पाठिंबा देणार या संबंधी लवकरच माहिती देण्यात येईल असे पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

जळगावमध्ये भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील गटाचे करण पवार यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आता येथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप उमेदवार अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024: सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे; फायदा कोणाला? 

वंचितने बदललेले उमेदवार

परभणी – पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार बाबासाहेब उगले यांना सुरुवातीला उमेदवारी देण्यात आली. नंतर येथे उमेदवार बदलण्यात आला. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना आता परभणीतून पाठिंबा देण्यात आला आहे.

यवतमाळ वाशिम – या लोकसभा मतदारसंघात पक्षाने सुरुवातीला खेमसिंह पवार यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनाही बदलण्यात आले. मात्र त्या उमेदवाराचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरवला. त्यानंतर आता समनक जनता पक्षाचे (गोर सेना) उमेदवार अनिल राठोड यांना वंचितने पाठिंबा दिला आहे.

शिरुर – पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघातून पक्षाने मंगलदास बागूल यांना उमेदवारी दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी बागूल हे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत हजर असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फडणवीस इंदापूर येथे आले असतानाही मंगलदास बागूल तिथे उपस्थित होते. भाजप आणि फडणवीसांसोबत असेलल्या त्यांच्या संबंधामुळे वंचितने मंगलदास बागूल यांची उमेदवारी रद्द केली.

सातारा – लोकसभा मतदारसंघात पक्षाने मारुती जानकर यांना उमेदवारी दिली होती. नंतर तिथे बदल करुन प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचव्या यादीत वंचितने हा बदल केला.

Edited by – Unmesh Khandale  

First Published on: April 23, 2024 1:24 PM
Exit mobile version