घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024: सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे;...

Lok Sabha 2024: सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे; फायदा कोणाला? 

Subscribe

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार राहुल गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या उमेदावारी मागे घेण्याबद्दल उलटसूलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एमआयएमनेही सोलापूरमधून उमेदवार देण्यास आधीच नकार दिला होता. त्यानंतर आता वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सोलापूरमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूरमधून माघार घेतली आहे. ते म्हणाले की, पक्षाने मला बंदूक तर दिली मात्र गोळ्याच दिल्या नाहीत, त्यामुळे मी लोकसभेच्या युद्धातून माघार घेत आहे. माझ्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो त्यामुळेही माघार घेत असल्याचे राहुल गायकवाड म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते साथ देत नसल्याचा आरोपही राहुल गायकवाड यांनी केला आहे.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारी मागे घेण्याआधी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली की नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी वंचित आता न्यूट्रल राहाणार की काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले नाही.

वंचितच्या उमेदवाराची माघार, फायदा कोणाला?

वंचित बहुजन आघीडीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे. राम सातपुते हे मुळचे बीडचे आहेत. भाजपने त्यांना माळशिरस येथून विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते 2019 मध्ये प्रथमच आमदार झाले. त्यांची लढत तीन वेळा सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रणिती शिंदेंशी होत आहे.
वंचित आणि एमआयएम या दोन प्रमुख पक्षांनी सोलापूरमधून माघार घेतली आहे, त्याचा फायदा हा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

2019 ची स्थिती काय होती? 

2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर लोकसभेत उमेदवार होते. तेव्हा त्यांची एमआयएमसोबत आघाडी होती. या निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता. तर भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झाले होते. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 47 हजार मते मिळाली होती. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार मते मिळाली होती.
डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी हे 5 लाख 24 हजार मतांसह विजयी झाले होते. वंचितच्या उमेदवाराने माघार घेताना माझ्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होत असल्याचे लक्षात आल्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचितच्या माघारीचा फायदा प्रणिती शिंदेंना होऊ शकतो.


Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -