महापरीक्षेतील प्रश्नांचे यूट्युबवर व्हिडिओ

महापरीक्षेतील प्रश्नांचे यूट्युबवर व्हिडिओ

महापरीक्षेतील प्रश्नांचे यू ट्युबवर व्हिडिओ

राज्यातील विविध खात्यांच्या भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ खासगी क्लासचालक परीक्षा होताच यू ट्युबवर अपलोड करीत असल्याने नंतर परीक्षा देणार्‍यांना पॅटर्न समजतो. परिणामी नंतर परीक्षा देणारे विद्यार्थी त्या अनुषंगानेच अभ्यास करतात. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसर्‍या टप्प्यात परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना यामुळे अधिक गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यातून नवाच वाद निर्माण झाला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्यासाठी पेपर यू ट्युबवर तातडीने अपलोड करण्यास राज्य शासनानेच बंदी घालावी, अशी मागणी पहिल्या टप्प्यात परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींकडून पुढे आली आहे.

राज्यातील विविध खात्यांच्या भरती प्रक्रियेसाठी महापरीक्षा हे अधिकृत वेब पोर्टल वापरले जात आहे. याद्वारे होणार्‍या ऑनलाईन परीक्षा आणि परीक्षाकेंद्रांच्या जाचक नियमांना सामोरे जावे लागत असतानाच खासगी क्लासेसने यू ट्युबवर अपलोड केलेले व्हिडिओ नोकरीच्या संधीसाठीच हानीकारक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या तलाठी पदासाठी महापरीक्षेद्वारे ऑनलाईन परीक्षा राज्यातील ३४ जिल्ह्यातील विविध केंद्रावर सुरू आहे. २ जुलैपासून सुरू झालेल्या या परीक्षा येत्या शुक्रवार (ता.२६) पर्यंत आहे. तेव्हापासून खासगी क्लासेसचालकांनी यू ट्युब चॅनेलवर त्या दिवसाचे प्रश्न आणि उत्तरे टाकायला सुरुवात केली आहे. परीक्षा देऊन केंद्राबाहेर आलेल्या परीक्षार्थींकडून प्रश्नांची माहिती घेतली जाते. त्यानंतर विशिष्ट साच्यात ती यू ट्युबवर टाकली जाते. मात्र, याचा जास्तीत जास्त फायदा शेवटच्या पुढच्या टप्प्यातील परीक्षार्थींना होत आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात परीक्षा दिलेले परीक्षार्थी या व्हिडिआेंच्या विरोधात आहेत. उशिरा परीक्षा असलेल्यांना याप्रकारच्या क्लिपमुळे प्रश्नांचे प्रकार आणि काठिण्य पातळी समजत आहे; त्या दृष्टीने ते अभ्यास करतात. पर्यायाने विद्यार्थ्यांना पेपर सोपे जात आहेत.

महापरीक्षेने तलाठी पदासाठी परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरवले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा ३४ जिल्ह्यामधील विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे.

स्पर्धेतून बाहेर गेल्याची भावना

माझा पेपर पाहिल्याच आठवड्यात झाला. आम्हाला परीक्षेचा पॅटर्न माहित नव्हता. मात्र, आमच्या पेपरमधील प्रश्न यू ट्युबद्वारे प्रसिद्ध झाल्याने आमच्या नंतर पेपर असणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांची काठिण्य पातळी समजली. तुलनेने त्यांना पेपर सोपा गेला. अशाप्रकारे निकालापूर्वीच स्पर्धेतून बाहेर गेल्याची भावना झाली आहे. याबाबत महापरीक्षेने यावर तोडगा काढावा सर्व परीक्षा सोबत घ्यायला हव्या. ऑफलाईन घेतल्या तरी चालतील. – सागर आंधळे, परीक्षार्थी.

प्रामाणिकपणाने मेहनत करणार्‍या विद्यार्थ्यंचे नुकसान

परीक्षा ही राज्यभरात एकाच दिवशी घेतली जावी. ऑनलाईन परीक्षेत असलेले प्रश्न यू ट्युब वर आल्याने सुरुवातीला परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच अंतिम टप्प्यातील विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा फायदा होत असून त्यांना पेपर सोपा जाण्यास मदत होत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणाने मेहनत करणार्‍या विद्यार्थ्यंचे नुकसान होत आहे. महापरीक्षेने नॉर्मलायझेशन हे रेल्वेच्या भरती प्रमाणे करावे. – उमेश बघडाणे, परीक्षार्थी

First Published on: July 22, 2019 11:50 PM
Exit mobile version