डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर आबांची लेक भडकली

डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर आबांची लेक भडकली

आर. आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील

डान्सबारला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यावर आता सर्वस्तररावरुन सरकारवर टीका सुरु झाली आहे. दरम्यान, ज्यांनी डान्सबारवर बंदी आणली होती त्या दिवंगत गृहमंत्री आर. आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस असल्याची खंत स्मिता पाटील यांनी बोलून दाखवली आहे. राज्य सरकारच्या कर्माची फळं असल्याची टीका स्मिता पाटील यांनी केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायदा करण्याची मागणी करणार असल्याचे स्मिता पाटील यांनी सांगितले आहे.

परवानगी मिळणे खेदजनक

स्मिता पाटील यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील गुन्हेगारीला आळा बसावा आणि वाममार्गाला लागणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आज पुन्हा डान्सबारला परवानगी मिळते ही बाब खेदजनक असल्याचे मत स्मिता पाटील यांनी व्यक्त केले. तसंच सरकारने कोर्टात योग्य भूमिका मांडली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारचे वकील सुनावणी वेळी अनेकदा गैरहजर रहायचे. तसेच २०१६ मध्ये कायद्यात बदल केल्यामुळेच डान्सबारला परवानगी मिळाली. यामुळे हे संपूर्ण सरकारचे अपयश असून डान्सबारला परवानगी मिळणे हे या सरकारचे फळ असल्याची टीका स्मिता पाटील यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडे कायदा करण्याची मागणी करणार

डान्सबारवर बंदी यावी या मागणीसाठी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार असल्याचे स्मिता पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील फाउंडेशन आणि कुटुंबीयांच्यावतीने राज्यात डान्सबार बंदीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास स्मिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – 

डान्सबार पुन्हा सुरू होणार नाही – रणजित पाटील

वेश्याव्यवसायापेक्षा डान्स बार चांगला – वर्षा काळेची मुक्ताफळे

First Published on: January 17, 2019 8:19 PM
Exit mobile version