Bailgada Sharyat: हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

Bailgada Sharyat: हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील

बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून स्वागत केले असून, हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा आहे, १२ वर्षापासून सुरू असलेला लढा सर्वांच्या प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला न्याय मिळावा म्हणून आपण केलेल्या सामूहीक प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले.

बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात ग्रामीण भागात मोठी आत्मियता आहे. या स्पर्धेतून रोजगारही निर्माण होत असल्याने या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास मिळालेला हिरवा कंदील मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. खिल्लारी देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने आजकचा निकाल पाठबळ देणारा ठरेल असा विश्वास, मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात बैलगाडी शर्यतीवर सन २०११ पासून न्यायालयाची बंदी होती. यावर राज्याने २०१७ यावर्षी कायदा करुन बैलगाडी शर्यती सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या कायद्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती व सर्वोच्च न्यायालयाने सदर स्थगिती उठविण्यास नकार दिला होता व सदर प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले होते.

विस्तारीत खंडपीठाच्या समक्ष सुनावणीसाठी राज्य शासनाने वकिलांची फौज उभी करुन भक्कमपणे कायदेशीर बाजू मांडली. शासनाच्या वतीने सॉलीसीटर जनरल ॲड.तुषार मेहता, ॲड.सिद्धार्थ भटनागर, ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी, ॲड. अभिकल्प प्रताप सिंह, ॲड. आदित्य पांडे, ॲड. गुंजन मंगला, ॲड. श्रीरंग वर्मा यांनी राज्याची बाजू मांडली. यासाठी शासनाचे अधिकारी केसच्या अनुषंगाने सर्व माहिती वकिलांना उपलब्ध करुन देत होते, असे विखे पाटील यांनी सांगितले. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या. सर्वाच्या सामुहीक प्रयत्नांचे यश आजच्या निकालात प्रतिबिंबिंत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : हुर्रर्र… बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च मान्यता; फडणवीस – कोल्हेंनी केले स्वागत


 

First Published on: May 18, 2023 3:47 PM
Exit mobile version