राहुल गांधी अॅपद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

राहुल गांधी अॅपद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

देशातील सर्वात जुना राजकिय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची श्रेष्ठींकडुन दखल घेतली जात नसल्याची ओरड नेहमीच होत असते. मात्र,आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून देशाच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांची दखल घेण्यासाठी अनोखे ‘शक्ती’ अॅप विकसीत करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपद्वारे राहुल गांधी यांचे संदेश पोहचवुन कार्यकर्त्यांशी दैनंदिन संवाद साधला जात आहे, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी केला आहे. ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या कोपरी-हाजूरी ब्लॉकच्या वतीने ठाण्यात पद नियुक्तिपत्र वितरण सोहळा आणि पक्ष-संघटन आढावा बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन संदीप बोलत होते.

हेही वाचा – चौकीदार ही चोर, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

राहुल गांधींनी केले आवाहन

इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या निर्देशानुसार, कोपरी-हाजूरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस कृष्णा भुजबळ यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काँग्रेसजनांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी, उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संदिप यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंध ठेवण्यास मदत झाल्याचे सांगून पूर्वीप्रमाणेच कॉंग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम पक्षातर्फे राबवले जात असल्याचे सांगितले. पूर्वी नेत्यासाठी घोषणा देताना, ‘तूम आगे बढो, हम तुम्हारे पीछे है’, असे म्हटले जायचे. मात्र,आता राहुल गांधींनी कार्यकर्त्यांनी पूर्वीप्रमाणे मागे न राहता नेत्यांसोबतच चलण्याचे आवाहन करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून तसेच प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधता यावा, यासाठी कॉंग्रेसने ‘शक्ती’ अॅप विकसित केले आहे. प्रत्येकाने हे ‘शक्ती’ अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रत्येक घडामोडीसह स्वत: राहुल गांधी यांच्याशी संदेशाद्वारे संवाद साधला जाणार आहे, असे संदीप म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी कोपरी-हाजुरी ब्लॉकमधील कॉंग्रेसच्या विविध पदांवरील नियुक्त्या घोषित करण्यात आल्या.


हेही वाचा – Rafale deal : राहुल गांधींचं मोदींना १५ मिनिटं चर्चेचं आव्हान

First Published on: November 20, 2018 6:55 PM
Exit mobile version