सुनील तटकरेंचा गीतेंच्या कार्य अहवालावर प्रहार

सुनील तटकरेंचा गीतेंच्या कार्य अहवालावर प्रहार

रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड किल्ला विभागात लाडवली येथे घेतलेल्या सभेत अनंत गीते यांनी काढलेल्या सिंहावलोकन या त्यांच्या कार्य अहवालावर जोरदार टीका केली. आजारी माणसांचेदेखील मतांसाठी गीतेंनी भांडवल केले आहे, अशा शब्दात त्यांनी प्रहार केला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षा कारेकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दानिश लांबे, तालुकाध्यक्ष नीलेश महाडिक, सुभाष निकम, चंद्रकांत जाधव, रघुवीर देशमुख, मेहबूब कडवेकर, शेकापचे नथुराम धामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जगताप यांनीदेखील देशातील सद्यःस्थितीचा आढावा घेत गीते यांनी रायगडच्या विकासासाठी काय केले, असा सवाल केला. यामुळे महाराष्ट्र बदलायचा असेल तर सरकार बदलणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तटकरे यांनीदेखील देशातील मोदी सरकारवर हल्ला चढवत देशात आज जे तंत्रज्ञान अवतरले ते राजीव गांधी यांच्यामुळेच, असे सांगून सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखवली, मात्र एकही स्वप्न पूर्ण झाले नाही. रायगडच्या मातीतला नसलेल्या उमेदवाराला आपण सातवेळा निवडून दिले. मात्र त्यांनी काय विकास केला, हे जनतेसमोर आहे. खासदार दत्तक म्हणून गीते यांनी दिवेआगर गाव घेतले आणि तेथे जेएसडब्लूच्या सहकार्याने केवळ शौचालय बांधण्याचे काम केले. मुरुड, गोरेगाव या ठिकाणीदेखील हेच एक काम केले आहे.

टोलमुक्त करू अशी भाषा करणार्‍या गीते यांनीच महामार्गावर टोल सुरू केला, अशा शब्दात टीका करून गीते यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्य अहवालावरदेखील सडकून टीका केली. केंद्रीय मंत्री राहिलेल्या माणसाला आजारी माणसाला केलेल्या मदतीचे देखील भांडवल करावे लागते ही शोकांतिका असल्याचे तटकरे म्हणाले.

First Published on: April 9, 2019 4:16 AM
Exit mobile version