Raigad Police Targeted criminals : रायगड पोलीस गावगुंडांविरोधात सक्रिय

Raigad Police Targeted criminals : रायगड पोलीस गावगुंडांविरोधात सक्रिय

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा आसूड उगारला आहे. निवडणूक काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपी आणि गुन्हेगारांना चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच अशा गुंडांकडून प्रतिज्ञापत्रावर चांगल्या वर्तनाची हमी लिहून घेतली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत ५८ आरोपींना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव आहेत. एक हजार १२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून २ हजार ५७५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईबाबतचे प्रस्ताव आहेत.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : 40 टक्के मतदारांनी मतदानाला अंगठा का दाखवला?

निवडणूक आचारसंहिततेचे पालन व्हावे, कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. यात कोणतीही चूक राहू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सुरुवातीपासूनच गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गुन्हेगाराला वर्तन सुधारण्याची एकदा संधी दिली जाते. नंतर त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाते. यातील अटी-शर्तीचा भंग केल्यास कारवाई करण्यात येते. हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय, दंडाधिकाऱ्यांकडून मंजूर होताच थेट कारवाईचा बडगा उगारून आरोपींना जिल्ह्याबाहेर काढले जाते. रायगड जिल्ह्यात दारूची हातभट्टी, दारू विक्री, जुगाराचे अड्डे, रेती तस्करी, जनावर तस्करी, गुटखा तस्करांवरही करडी नजर आहे. या गुन्हेगारांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. अशा आरोपीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर थेट हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली जाते.

हेही वाचा… Raigad liquor Crime : रायगडमधील हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

सराईत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचणार नाही, असे हमीपत्र भरून घेतले जात आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयात संपूर्ण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना बोलावून सूचना दिल्या जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये १०७ नुसार एक हजार ३४, १०९ नुसार २४, ११० नुसार २०, ९३ नुसार २७, ५५ नुसार ११, ५६ नुसार ९, ५७ नुसार ३ असा एकूण एक हजार १२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. १०७ नुसार दोन हजार २४७, १०९ नुसार ८२, ११० नुसार १०२, ९३ नुसार १०६, ५५ नुसार ५, ५६ नुसार २८, ५७ नुसार २८ आणि १४४(३) नुसार ५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव दिले आहेत. रायगड जिल्हा पोलिसांच्या हद्दीतील ११ आरोपी फरार आहेत. तर ६६३ वॉन्टेड आरोपींना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

कठोर कारवाई करणार

निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर रायगड पोलिसांनी आतापर्यंत दारूबंदीचे १७५, अवैध शस्त्राबाबत ३ आणि एनडीपीएस अंतर्गत १ गुन्हा दाखल करून नऊ लाख ६३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय ५८ आरोपींना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. त्यामुळे कुणी कायदा हातात घेतला तर कठोर कारवाई करणार. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा

First Published on: April 26, 2024 1:04 AM
Exit mobile version