Raigad Water Crisis : जलजीवन मिशन योजनेतही भेदाभेद?

Raigad Water Crisis : जलजीवन मिशन योजनेतही भेदाभेद?

खालापूरमधील हाळे खुर्द गावातील जलजीवन योजनेचं वास्तव

खलील सुर्वे : आपलं महानगर वृत्तसेवा

खालापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ कार्यक्रमाद्वारे प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवण्याची योजना राबवण्यात येत आहे. प्रत्येक घरामध्ये दरदिवशी दरमाणसी ५५ लिटर पाणी पुरवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. परंतु, खालापूर तालुक्यातील हाळ खुर्द गावामध्ये नळाने पाणी पुरवण्याबाबत अनेक समस्या आहेत.

काही घरांना फूल फोर्सने पाणीपुरवठा होत आहे तर काही घरांना मोटर लावून पाणी खेचावे लागत आहे. अनेक घरांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. तसेच नळांना पाणी आले तरी अगदी बारीक धार असते. तेही पाणी अर्धा ते एक तास येते. त्यामुळे धड पिण्याचेही पाणी पुरेसे मिळत नाही. ही समस्या हाळ गावातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दिसते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाळ ग्रामस्थ प्रचंड नाराज आहेत.

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

खालापूर तालुक्यातील हाळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये काही वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्या, पाईपलाईन, बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या आजही सुटलेली नाही. पाण्याची जोडणी मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयापासून मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसीलदारांपर्यंत पत्रव्यवहार केल्यानंतर नळ जोडणी दिली जाते.

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

दरम्यान, नळ आले तरी अगदी कमी दाबाने पाणी सोडण्यात आल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. लोकप्रतिनिधींच्या व्हीआयपी लोकांच्या घरात वेगाने पाणीपुरवठा केला जातो. इतरांना मोटर लावून पाणी खेचावे लागते. असे का? आम्ही कोणते घोडे मारले की, आम्हाला पुरेसे पाणी दिले जात नाही? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक भ्रष्टाचार उघड झाले आहेत. तरीही वरिष्ठ अधिकारी गप्प का? कारवाई का केली जात नाही? ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकारी का घेत नाही? या भ्रष्टाचाराच्या गंगेत यांनाही हिस्सा मिळालेला आहे का? पाणी कमी दाबाने का येते याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करणार का? असे अनेक सवाल आता संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत.

First Published on: April 16, 2024 10:00 PM
Exit mobile version