घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

Subscribe

पाणीटंचाईमुळे पेण तालुक्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. सध्या ६ गावे, ५८ वाड्यांना पाच दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे आराखडे-नियोजन कागदावरच असून पाण्याअभावी लोकांचे हाल सुरूच आहेत.

मितेश जाधव – आपलं महानगर वृत्तसेवा

पेण : ‘नेमेची येतो उन्हाळा, पाण्यासाठी वणवण फिरा’ हे पेण तालुक्यासाठी अगदी तंतोतंत लागू होते. पाण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केल्या खऱ्या पण पाणीटंचाई काही पिच्छा सोडत नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही पेण तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनांचे काम अर्धवट अवस्थेत आहे तर कुठे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पाण्याची समस्या सुटलेली नाही. मग पाण्याच्या योजनांवर सरकार कोट्यवधी रुपये का खर्च करते, असा सवाल पेण तालुक्यातील तहानलेले जीव करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याला मार्च, एप्रिल, मे आणि जून हे चार महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या ६ गावे आणि ५८ वाड्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांना आणि वाड्यांना पाच दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होते. त्यामुळे धड पिण्याच्या पाण्याचीही सोय होत नाही. उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्यासाठी बाटलीचे पाणी विकत घ्यावे लागते. ते खूप महाग असते, अशी लोकांची तक्रार आहे. पण आंघोळ, कपडे धुणे, भांड्यांसाठी शिवाय इतर विधीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काय, असा पाणीटंचाईग्रस्त लोकांचा सवाल आहे. या पाणीटंचाईमुळे जगणे अवघड झाल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

पाणीटंचाईमुळे पेण तालुका मेटाकुटीला आला आहे. पाण्यासाठी महिला वणवण फिरताना दिसत आहेत. पेण पंचायत समितीने यंदा मार्च ते जून या कालावधीत पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी २ कोटी १४ लाख ५० हजार रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठवला आहे. यात ५४ गावे आणि १९० वाड्यांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ८५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. तर पाच नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २९ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा अधिकारी संजय कांबळे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

या पार्श्वभमीवर प्रशासनाने काही दिवसांपूर्वी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. या आराखड्याप्रमाणे विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी दीड कोटीची तरतूद केली आहे. नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे यासाठी निधी खर्च करण्यात कात्री लावली आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, यात शहापाडा प्रादेशिक नळ पाणीपुरवठ्याच्या पाच उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यावर २९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे.

प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे १० टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी जून महिन्यापर्यंत पावसाचे आगमन होईपर्यंत टंचाईग्रस्त ५४ गावे आणि १९० वाड्यांवर संभाव्य पाणीटंचाईचे संकट आहे. असे आराखडे दरवर्षी तयार केले जातात, त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. पुन्हा पुढच्या वर्षी ये रे माझ्या मागल्या सुरूच असते. पुन्हा पाणीटंचाई, पुन्हा आराखडे, पुन्हा कागदी घोडे, पुन्हा पाण्याशिवाय हाल… तेच ते आणि तेच ते..!

हेही वाचा… Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

पेण, वाशी, खारेपाट, वडखळ, शिर्की, मसद या विभागांत टंचाईग्रस्त गावांची संख्या जास्त असल्याने पाऊस सुरू होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करावाच लागतो. पेण पंचायत समिती प्रशासनाकडून दरवर्षी दीड कोटीहून अधिक रकमेचा टंचाई कृती आराखडा मंजूर करते. तो आता दोन कोटींच्या घरात गेला आहे. टंचाईग्रस्त गावांना नळाने शुद्ध पाणी केव्हा मिळेल, हे आजही कुणी ठामपणे सांगत नाही. दोन दशकांपासून हा टंचाई कृती आराखडा बनवला जातो आणि टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. एवढे असूनही पेण तालुका पाणीटंचाईमुक्त झालेला नाही, हे विशेष.

हेटवणे धरणात मुबलक पाणीसाठा असूनही सदोष वितरण व्यवस्थेअभावी पेण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टंचाई काळात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, ही म्हण पेणकरांसाठी खरी ठरत आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या हेटवणे धरणाचे पाणी पेणला मिळत नसेल तर त्याचा आम्हाला उपयोग काय, असा संतप्त पेण तालुक्यातील ग्रामस्थ विचारत आहेत.

सध्या मसद बुद्रुक बोर्झे, वाशी, वढाव, दिव या खारेपाटण विभागातील ग्रामपंचायतीतील टंचाईग्रस्त गावांसह पेण तालुक्यातील ५८ वाड्या आणि ६ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पेण पूर्वेकडे जावळी, वाकरुळ, वरप, पाबळ या ग्रामपंचायतींमधील डोंगर भागातील आदिवासी वाड्यावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण हा पाणीपुरवठा पाच दिवसांमधून एकदा होतो आणि तोही पुरेसा नसल्याने एवढ्याच्या पाण्यात कसे भागवायचे, हा प्रश्न त्यांना कायम सतावतो.

हेटवणे धरणाचा आधार

हेटवणे मध्यम प्रकल्पातून सिडकोला (नवी मुंबई) दरदिवशी १८० एम.एल.डी. पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी जूनअखेरीस धरणात २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहतो. हेटवणे धरणातून सिडकोच्या कार्यकक्षेतील द्रोणागिरी, उलवे‌ नोड, खारघर, जेएनपीए, उरण आदी निवासी वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पेणच्या चावणे पाणीपुरवठा योजनेतील २५ गावे तसेच दक्षिण शहापाडा प्रादेशिक योजनेतील २९ गावे ४३ वाड्यांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -