परतीच्या पावसाचं धुमशान; सोलापुरमधील नद्यांना पूर, NDRFची टीम दाखल

परतीच्या पावसाचं धुमशान; सोलापुरमधील नद्यांना पूर, NDRFची टीम दाखल

सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाचं धुमशान सुरू आहे. मागील चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यभरातील भात, सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, ऊस, मका आणि फळं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या परतीच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं खूप नुकसान झालं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पूर आल्यानं लोकं वाहून गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून सध्या १ लाख क्यूसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भीमा नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूर-भोगावती नदीला पूर आला असून अनेक शेतकरी पुरात अडकले आहेत. त्यामुळे सोलापुरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १८३ गावांना पावसाचा तडाखा बसला आहे. बार्शी तालुक्यातील १३७ गावांना फटका बसला आहे. कालपर्यंत १३३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती आहे.

नद्यांना आले पूर

मुसळधार पावसामुळे सोलापुरमध्ये अनेक भागात नदीला नाल्यांना पूर आला आहे. सावळेश्वर ता. मोहोळ येथील शंकर देवकर यांच्यासह ४ जण पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप त्यांच्या शोध लागला नाही आहे. तसंच बार्शीमध्ये मुंगशी येथे एक वृद्ध व्यक्ती नागझरी नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. तर माढा येथील एक व्यक्ती पाण्यातून वाहून गेली आहे. शिवाय माढा येथे एक कार वाहून गेली असून त्यामध्ये तीन व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे.

वाहतुकीवर झाला परिणाम

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. उत्तर सोलापुरातील मार्डी ते राळेरास मार्गावरील ओढ्याच्या पुलावरील पाणी असल्याने वाहतूक बंद झाली होती. तसेच सोलापुरातील कवठे ते बेलाटी येथील वाहतूक ओढ्याच्या पुलावरील बंद होती. तर पावणी गावाचा रेल्वे पुलाखालून जाणारा रस्ता बंद असून तिऱ्हे मार्गे वाहतूक सुरू आहे.

दरम्यान पंढरपुरात बुधवारी दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन वारकरी महिलांचा समावेश आहे. पंढरपुरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कुंभार घाटाचे नव्याने केलेले बांधकाम कोसळून ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढले आहेत.


हेही वाचा – Weather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा


 

First Published on: October 15, 2020 11:30 AM
Exit mobile version