पावसाळ्यात राणीच्या बागेतील पर्यटकांसह उत्पन्नही घटले

पावसाळ्यात राणीच्या बागेतील पर्यटकांसह उत्पन्नही घटले

मुंबईची शान व पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत मे महिन्यात जवळजवळ ४ लाख पर्यटकांनी भेट दिली तर पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्यात ही संख्या २ लाख ४५ हजारांवर घसरली. त्या तुलनेत विशेषतः जुलै महिन्यात भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या तर ७६ हजारांवर घसरली आहे. त्यामुळे त्याचा उत्पन्नावरही काहीसा परिणाम झाला आहे. पुढे पावसाळ्याचे आणखीन २ महिने बाकी आहेत. त्यामुळे राणी बागेला मिळणार्‍या उत्पन्नावर आणखी परिणाम होऊ शकतो.

भायखळा येथील राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) ही देशभरात प्रसिद्ध आहे. गेल्या ३ – ४ वर्षात राणी बागेचा चेहरामोहराच बदलला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून राणी बागेच्या विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राणी बागेत चांगली विकासकामे झाली आहेत. विदेशातून पेंग्विन आणण्यात आले आहेत. इतर प्राणीही देश-विदेशातून राणी बागेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जापनीज गार्डन बनविण्यात आले आहे. अजूनही काही विकासकामे करायचे काम चालू आहे. मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मध्यंतरी दोन वेळा राणीची बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे राणी बागेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. मात्र जेव्हापासून राणी बागेत पेंग्विन आणण्यात आले आहेत, तेव्हापासून राणी बागेत येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली व उत्पन्नातही वाढ झाली.

१ ते ३० एप्रिल या कालावधीत राणी बागेत १ लाख ७२ हजार २१० पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बागेच्या तिजोरीत ६९ लाख ६९ हजार ९०५ रुपये उत्पन्नाची भर पडली. त्याचप्रमाणे, १ ते ३१ मे या कालावधीत राणी बागेत ३ लाख ९४ हजार ७१८ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बागेच्या तिजोरीत १ कोटी ५२ लाख ७१ हजार ८३० रुपये उत्पन्नाची भर पडली. तर, पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्यात १ ते ३० जून या कालावधीत राणी बागेत २ लाख ४५ हजार ३४३ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बागेच्या तिजोरीत ९६ लाख ९० हजार १९० रुपये उत्पन्नाची भर पडली.

तसेच, जुलै महिन्यात १ ते २३ मे या कालावधीत राणी बागेत फक्त ७६ हजार ८६ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बागेच्या तिजोरीत फक्त ३२ लाख ५१ हजार ३१५ रुपये उत्पन्नाची भर पडली. आकडेवारीवर नजर फिरवल्यास मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये आणि जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात राणी बागेत येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत आणि उत्पन्नातही मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.

First Published on: July 25, 2022 1:59 AM
Exit mobile version