राज ठाकरेंची नवी घोषणा; चर्चा एका झेंड्याची, पण मनसेचे आता २ झेंडे!

राज ठाकरेंची नवी घोषणा; चर्चा एका झेंड्याची, पण मनसेचे आता २ झेंडे!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

एकीकडे महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यासोबतच त्यांनी अनावरण केलेल्या भगव्या झेंड्याची देखील मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर, आधीच जाहीर झालेल्या झेंड्याचं राज ठाकरेंनी औपचारिकरित्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अनावरण केलं. मात्र, त्यासोबतच राज ठाकरेंनी एक नवी घोषणा केली. मनसेच्या भगव्या झेंड्याची चर्चा असतानाच राज ठाकरेंनी मात्र अजून एका झेंड्याची घोषणा केली आहे!

२ झेंड्यांची घोषणा आणि कार्यकर्त्यांचा गलका!

मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनात अनेक ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये शॅडो कॅबिनेटचा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तसेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचं देखील या अधिवेशनामध्ये लाँचिंग करण्यात आलं. त्यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या संपूर्ण अधिवेशनात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील मनसेच्या नव्या झेंड्याचं अप्रूप दिसून आलं. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान दोन झेंड्यांची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच गलका केला.

‘हा तर माझ्या मनातला मूळ झेंडा!’

‘२००६ साली जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता, तो हा झेंडा आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा माझे आजोबा तिथे हजर होते. माझ्या आजोबांनी ते नाव दिलेलं आहे. तो झेंडा संयुक्त महाराष्ट्र समितीचा भगवा होता. सुरुवात करताना माझ्यामागे कुणीही नव्हतं. हा झेंडा माझ्या मनात असताना मला अनेकांनी सांगितलं आपल्यासोबत हिरवा, निळा असे सगळे असले पाहिजेत. पण भगव्याखालीच सर्वांना सोबत घेऊन शिवरायांनी राज्य केलं. पक्षाचा मूळ डीएनए भगवाच आहे. त्यामुळे आता ठरवलं की तो झेंडा आता आणायचाच. झेंड्यावर महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे तो जेव्हा हातात घ्याल, तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. ती राजमुद्राच आपली प्रेरणा आहे. त्यामुळे आपले दोन झेंडे आहेत. एक हा आणि दुसरा निशाणीचा. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, या दुसऱ्या झेंड्यावर राजमुद्रा नसेल, असे संकेत राज ठाकरेंनी यावेळी दिले. मात्र, त्यावर इंजिन असेल का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण वाचण्यासाठी क्लिक करा!
First Published on: January 23, 2020 8:21 PM
Exit mobile version