सरडा पण लाजेल एवढी भूमिका राज ठाकरेंनी बदलली, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

सरडा पण लाजेल एवढी भूमिका राज ठाकरेंनी बदलली, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सरडाही लाजेल एवढी भूमिका राज ठाकरेंनी बदलली असल्याचं त्या म्हणाल्या. आज मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. तसंच, भाजपा, शिंदे गटावरही त्यांनी निशाणा साधला.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांना हिणवलं गेलं. आताचे मुख्यमंत्रीही तेच करतायत. जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर व्हावा अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही त्याचा वापर केला तर नावं ठेवली गेली. म्हणजे नावडतीचं मीठ आळणी, असंच यातून सिद्ध होतंय.

हेही वाचा – नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा; भाजप आमदाराची मागणी

सुषमा अंधारेंमुळे शिवसेनेतील इतर महिला नेत्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, कोणाचंच अस्तित्व कोणामुळे धोक्यात येत नसतं. तुमचं अस्तित्व धोक्यात येत होतं, म्हणून तुम्हाला पक्ष वेगळा काढावा लागला, असं शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.


सरडा पण लाजेल एवढी भूमिका बदलतात. भोंगे वाजवू नये म्हणून यांनी आंदोलन केले. आता स्वतःच भोंगे वाजवले. लोकांना इतकं गृहित धरायला लागलेत. पण लोकांनी तुम्हाला गृहीतच धरलंय. त्या पक्षाचं नाव काय यापेक्षा इमेज काय आहे हे त्यांनाही माहितेय, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.

सी ग्रेडपासून आलेल्या आणि ए ग्रेडपर्यंत पोहोचणाऱ्या राजकारणात कसे पोहोचयायत ते सगळ्यांना माहितेय. बच्चू कडूंबाबत हे नौटंकी दाम्पत्य काही बोलत असेल तर बच्चू कडूंना त्रास होणं साहजिकच आहे. झुठ बोलेंगे, लेकिन रेटून निट बोलेंगे असं हे दाम्पत्य आहे, अशी टीका त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर केली.

हेही वाचा – तिरडीवर उठून बसला मृत तरुण, चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी

शिंदे गटाच्या आमदारांवर मी बोलणारच नाही. सगळं छान असतानाही घराला आग लावून जाणाऱ्यांवर काय बोलावं, त्यांचं त्यांनी निस्तरावं. स्वच्छ वातावरणात जे आलेत त्यांच्याशी आमचं नातं दृढ होतंय. कोण गेलंय यापेक्षा कोण आलेय आणि साथ आणि साद घालतायत ते आमचे आहेत. उद्धव ठाकरे बरोबर ट्रॅकवर आहेत, त्यांचा ट्रॅक चुकवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते भरकटले आहेत, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

First Published on: October 27, 2022 12:25 PM
Exit mobile version