काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचं सरकार बेकार – राज ठाकरे

काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचं सरकार बेकार – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

आताचं सरकार हे आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारपेक्षाही बेकार असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आज, शनिवारी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी देश जितका खड्ड्यात घातला आहे, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत. मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग आहे. हा रागच मतांमधून बाहेर पडला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

वाचा : राज ठाकरेंनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

नोटाबंदी हा स्वत:साठी खणलेला खड्डा

कॉम्प्यूटर तसेच मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यात साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी जारी केली. यावरुनही राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल, आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का?, असा सवाल त्यांनी विचारला. जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं सरकारच्या चुकांचं प्रमाण वाढेल, नोटाबंदी हा नरेंद्र मोदींनी स्वत:साठी खणलेला खड्डा होता, अशी टीकाही त्यांनी केली.

वाचा : माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन – राज ठाकरे

सेना-भाजपच्या सभांची गर्दी आटली

राज यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘शिवसेना-भाजपच्या सभांची होणारी गर्दी आटली आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालल्याचंच हे द्योतक आहे, असं सांगतानाच, ‘सेना-भाजपवाले काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा बेकार निघाले,’ असं राज म्हणाले. हनुमानाच्या जातीवरून राजकीय नेते करत असलेल्या अनावश्यक चर्चेचाही राज यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ‘हनुमान उडत असल्यानं वेगवेगळ्या देशात जात असणार. त्यामुळं तो सगळ्यांना आपला वाटत असणार, असा टोला त्यांनी लगावला.

वाचा : पाहा काय सांगितलं या शेतकऱ्यानं राज ठाकरेंना!

मनसेचे महत्व भाजपला जास्त कळले

भाजपचे महापालिकेतील सत्ताकारण बघता मनसेची सत्ता चांगली होती असे लोक म्हणत असल्याचे राज यांना पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच, आमचे महत्व नाशिकरांपेक्षा भाजपला जास्त कळले आहे असा टोला त्यांनी लगावला.

अमित यांच्या विवाहास निवडक पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारीला होणार असून राज ठाकरे यांनी लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या पायाशी ठेवली. या सोहळ्याचे स्वरूप कसे असेल असा प्रश्न विचारला असता, अतिशय निवडक लोकांनाच विवाहाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओळखीतील लोकांची यादी तयार करायला घेतली असता जवळपास पाच- सहा लाख लोकांची नावे निघाली. मनसेच्या विविध शाखा आणि अंगीकृत संघटनांच्या पुरुष अध्यक्षांची संख्या ही ११ हजारापर्यंत आहे. त्यात या अध्यक्षांबरोबर येणारे तेजा आणि डागा हे वेगळेच असे राज यांनी सांगताच एकच हशा पिकला. इतक्या मोठ्या संख्येतील लोकांची व्यवस्था कोठे करणार, असा प्रश्न उपस्थित करत पत्रकारांच्या हौशेपोटी नवदाम्पत्याची ससेहोलपट करणे मला पटणारे नाही. त्यामुळे मी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आताच दिलगिरी व्यक्त करतो, असेही राज यांनी विशद केले. पंतप्रधान मोदींना लग्नपत्रिका देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता,’ मोदींचा विवाह व्यवस्थेवर किती विश्वास आहे हे आपणास माहीतच आहे’, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला.

राज ठाकरे उवाच

First Published on: December 22, 2018 12:19 PM
Exit mobile version