माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन – राज ठाकरे

माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन – राज ठाकरे

राज ठाकरे

नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर या शेतकऱ्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना ‘मंत्र्यांना कांदे फेकून मारा’ अशा दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी नाशिकमध्येच एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी तिथे जमलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ‘कांदा फेकून मारण्याच्या’ सल्ल्याची आठवण करून दिली.

यांना कांदेच कळतील…

दरम्यान, आपल्या आधीच्या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांदे फेकून मारण्याच्या सल्ल्याची आठवण करून दिली. ‘या सरकारला निवेदनाची भाषाच कळत नाही, त्यामुळे मंत्र्यांनी ऐकलं नाही तर कांदे फेकून मारा’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, ‘माझ्या कालच्या वक्तव्याचं वृत्त सगळीकडे पसरलं, ते राज्य सरकारपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी कांद्याला २०० रुपये क्विंटल भाव जाहीर केला. पण माझं एवढ्यानं समाधान होणार नाही. त्यामुळे मी आता शेतकऱ्यांशी संवाद साधेन. सगळ्या गोष्टींचा आढावा घेईन आणि काही दिवसांनी पुन्हा इथे येऊन माझी भूमिका स्पष्ट करेन’, असं देखील राज ठाकरेंनी नमूद केलं.

‘पोतडी निवडणुकीत उघडेन’

यावेळी ‘स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने हा सगळा कार्यक्रम आयोजित केल्याचं’ राज ठाकरेंनी सांगितलं. ‘मला माहितीही नव्हतं की इथे असा जाहीर कार्यक्रम वगैरे आयोजित केला असेल. पण आत्ता मी फार काही बोलणार नाही. आपल्या पोतडीत काय काय आहे, ते निवडणुकीच्या वेळी बाहेर काढीन’, असं सूचक वक्तव्य यावेळी बोलताना त्यांनी केलं. त्यामुळे राज ठाकरेंच्या पोतडीची चर्चा आता सुरू झाली आहे.

First Published on: December 20, 2018 1:20 PM
Exit mobile version