BJP : मोदींच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत…; महायुतीला पाठिंबा देताच भाजपाने राज ठाकरेंचे मानले आभार

BJP : मोदींच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत…; महायुतीला पाठिंबा देताच भाजपाने राज ठाकरेंचे मानले आभार

मुंबई : या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सस्नेह स्वागत असे शीर्षक देत ट्वीट करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Raj Thackery : मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून…; राज ठाकरेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकास आणि समृद्धीच्या वाटेवर निघाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासारख्या दुरदृष्टी लाभलेल्या नेतृत्त्वाची साथ मिळत आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची गुढी अधिक मजबूत झाली आहे. अब की बार 400 पार असा नाराही बावनकुळे यांनी दिला आहे. 

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

दरम्यान, राज ठाकरे आजच्या मेळाव्यात म्हणाले की, मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहे, हे फडणवीसांना मी स्पष्टपणे सांगितलं. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली.

हेही वाचा – Raj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

First Published on: April 9, 2024 10:16 PM
Exit mobile version