वाचा मनसे अधिवेशनातलं राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण!

वाचा मनसे अधिवेशनातलं राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण!

पक्ष स्थापनेनंतर गेल्या १४ वर्षांत पहिल्यांदाच मनसेने पक्षाचं अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. पूर्णपणे भगव्या रंगातल्या या झेंड्यामुळे मनसेने आता मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची मोठी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत होती. त्यावर अखेर राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उत्तर दिलं आहे. अधिवेशनाच्या दिवशी सकाळी राज ठाकरेंनी झेंड्याचं अनावरण केल्यानंतर ‘माझं भाषण संध्याकाळी होईल’, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सर्व मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी ‘झेंडा आवडला का?’ या विचारलेल्या प्रश्नाला उपस्थित मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शॅडो कॅबिनेटविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘पक्षातल्याच नेत्यांची एक टीम उभी करून सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांवर आणि त्यांच्या मंत्र्यांवर ही टीम देखरेख ठेवेल. आपलं सरकार आल्यानंतर देखील ते हे काम करतील.’

भगवा झेंडाच का घेतला?

२००६ साली जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता, तो हा झेंडा आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा माझे आजोबा तिथे हजर होते. माझ्या आजोबांनी ते नाव दिलेलं आहे. तो झेंडा संयुक्त महाराष्ट्र समितीचा भगवा होता. सुरुवात करताना माझ्यामागे कुणीही नव्हतं. हा झेंडा माझ्या मनात असताना मला अनेकांनी सांगितलं आपल्यासोबत हिरवा, निळा असे सगळे असले पाहिजेत. पण भगव्याखालीच सर्वांना सोबत घेऊन शिवरायांनी राज्य केलं. पक्षाचा मूळ डीएनए भगवाच आहे. त्यामुळे आता ठरवलं की तो झेंडा आता आणायचाच.झेंड्यावर महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे तो जेव्हा हातात घ्याल, तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. ती राजमुद्राच आपली प्रेरणा आहे. त्यामुळे आपले दोन झेंडे आहेत. एक हा आणि दुसरा निशाणीचा. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही. याआधी देखील झेंडे बदलले आहेत. जनता पक्षाने देखील झेंडा बदलला आहे. कात टाकावी लागते, सकारात्मक गोष्टींसाठी चांगला बदल आवश्यक असतो.

देशाशी जे मुसलमान प्रामाणिक आहेत, ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलामांना, झहीर खानला, जावेद अख्तरांना आम्ही नाकारू शकत नाही. उर्दू ही मुसलमानांची भाषा कधीच नव्हती. बांग्लादेशी मुसलमान उर्दूसाठी नसून बंगाली भाषेवर स्वतंत्र झाले. भाषा ही रिलीजनची नसते, रिजनची असते.

जिथं धिंगाणा घालणार, तिथे आम्ही आडवेच जाणार

रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला होता, तेव्हा मनसेने त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा पाकिस्तानी कलाकार आले, तेव्हा त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं होतं. तेव्हा का कुणी विचारलं नाही की हिंदुत्वाकडे का चाललात?

मला हिंदुत्व समजावून तरी सांगा

आमची आरती त्रास देत नाही, तर नमाज का त्रास देतोय? नमाज जरूर पढा. तो तुमच्या धर्माचा विषय आहे. पण भोंगे लावून का पढताय? बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर किती येत आहेत, त्याचा कुणाला पत्ता लागत नाहीये. या घुसखोरांना हाकललं, तेव्हा कुणी का विचारलं नाही हिंदुत्वाकडे चाललात का? मला एकदा हिंदुत्व समजावून तरी सांगा.

भारत काय धर्मशाळा आहे का?

बांगलादेशातून भारतात यायचं असेल, तर फक्त अडीच हजार रुपये लागतात. पाकिस्तानमधून येणारे नेपाळ मार्गे येत आहेत. हे एनआरसी वगैरे चालू आहे. पण सगळ्यात आधी समझौता एक्सप्रेस बंद करा. यांच्याशी आपल्याला संबंध हवेत कशाला? उद्या युद्ध झालं, तर आपल्या सैन्याला बाहेर जायची गरज नाही. आतच लढावं लागेल. बाहेरून येणाऱ्यांना आपण का पोसायचं. हे कुठे आहेत, यांना कोण मदत करतं, याची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे. मुंबई पोलिसांना ४८ तास मोकळा हात द्या. बघा काय करून ठेवतील ते.

२५ मार्चला शिवाजी पार्कवर गुढी पाडव्याची सभा

येत्या ९ मार्चला पक्षाला १४ वर्ष पूर्ण होतील. गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला वाटत होतं की पक्षाचं अधिवेशन व्हायला हवं. तसंही आता अधिवेशनाची पद्धत सध्या कमीच होत चालली आहे. ९ मार्चला पक्षाचा वर्धापन दिन आहे तर २५ मार्चला आपली शिवाजी पार्कवर गुढी पाडव्याची सभा आहे, असं राज ठाकरे म्हणाले

सोशल मीडियावरून टोचले कान

पक्षाचे अनेक पदाधिकारी, काही कार्यकर्ते काही ज्यांचा संबंध नाही, हे पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत फेसबुक आणि ट्वीटरवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. आता पक्षाबद्दल किंवा संघटनेबद्दल कोणतीही वाईट गोष्ट सोशल मीडियावर आलेली चालणार नाही. टीका करायची असेल, तर आम्ही इथे आहोत. त्यासाठी सोशल मीडिया ही काही जागा नाही. असं परत आढळलं, तर त्या व्यक्तीला पदावरून बाजूला करेन.

‘यशाला बाप खूप असतात’

यश मिळाल्यावर प्रत्येकजण सांगतो, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. यशाला बाप खूप असतात, आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. पराभवाचे दिवस आले की सगळे सांगायला लागतात. काही चांगल्या गोष्टी निश्चितच घ्यायला हव्यात. यासाठी पक्षात एक विभाग आपण तयार करतोय. संघटनेचं काम करणाऱ्यांची त्यात नोंदणी होईल. बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके या दोघांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक रचना उभी करण्याची जबाबदारी असेल.

मोर्चाला उत्तर मोर्चाने दिलं जाईल

या सगळ्या वातावरणात जे मोर्चे निघाले, त्यानंतर आता येत्या ९ फेब्रुवारी आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुसलमानांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असेल.

First Published on: January 23, 2020 7:19 PM
Exit mobile version