Rajan Salvi : “सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार”, पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाल्याने साळवी संतापले

Rajan Salvi : “सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार”, पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाल्याने साळवी संतापले

पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाल्याने साळवी संतापले

रत्नागिरी : मागील आठवड्यात 09 जानेवारीला ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना अलिबाग ACB कार्यालयातून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसारे ते 10 जानेवारीला एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. परंतु, पुन्हा कोणत्याही कारवाईसाठी हजर राहणार नाही, जी कारवाई करायची ती करा, असे साळवी यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण आज (ता. 18 जानेवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरी छापा टाकला आहे. एसीबीचे काही अधिकारी साळवी यांच्या घरी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास हजर झाले आहेत. एकाच वेळी राजन साळवी यांच्याशी संबंधित असलेल्या तीन ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. जी कारवाई करायची आहे ती करुद्यात, पण मी घाबरणार नाही, असेही साळवी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण आता पत्नीवर आणि मोठ्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याने साळवी संतापले आहेत. (Rajan Salvi was furious after ACB registered a case against his wife and son)

हेही वाचा… Rajan Salvi : “काहीही कारवाई झाली तरी…”, राजन साळवींचा ठाकरेंसोबत राहण्याचा पुनरुच्चार

आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला असून एसीबीकडून याच प्रकरणाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी साळवी यांच्यावर रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता साळवी संतापले असून याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशाराच त्यांच्याकडून प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे. प्रसार माध्यमांसमोर साळवी म्हणाले की, माझ्या रत्नागिरीतील मूळ घरी, हॉटेलमध्ये, भावाच्या घरी एसीबीची चार ते पाच पथके आली आहेत. त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू असून माझ्यावरही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती साळवी यांच्याकडून देण्यात आली.

तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्या दृष्टीने मी दोषी असेल. पण राजन साळवी काय आहे, कसा आहे, हे माझ्या कुटुंबाला, पक्षाला, माझ्या जनतेला, मतदारसंघाला माहीत आहे. पण माझ्या पत्नीवर, मोठ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात याचे परिणाम या सरकारला भोगावे लागणार असे माझे मत असल्याचे म्हणत राजन साळवी यांनी संताप व्यक्त केला. तसेच, अजूनही चौकशी सूरू आहे. माझे किंवा कुटुंबाचे मत नोंदविण्यात आलेले नाही. तर, उद्धव ठाकरे हे सतत माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ही माहिती कळताच त्यांनी मला तत्काळ फोन करून संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला, ज्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अटक तर होणारच आहे. त्यामुळे अटकेला घाबणारा हा बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांच्याकडून देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांनी अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीने केला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख इतकी आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा जमा केल्याचा आरोपही राजन साळवींवर लावण्यात आला आहे.

First Published on: January 18, 2024 2:28 PM
Exit mobile version