घरमहाराष्ट्रRajan Salvi : "काहीही कारवाई झाली तरी...", राजन साळवींचा ठाकरेंसोबत राहण्याचा पुनरुच्चार

Rajan Salvi : “काहीही कारवाई झाली तरी…”, राजन साळवींचा ठाकरेंसोबत राहण्याचा पुनरुच्चार

Subscribe

रत्नागिरी : मागील आठवड्यात 09 जानेवारीला ठाकरे गटाचे राजापूर विधानसभेचे आमदार राजन साळवी यांना अलिबाग ACB कार्यालयातून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसारे ते 10 जानेवारीला एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. परंतु, पुन्हा कोणत्याही कारवाईसाठी हजर राहणार नाही, जी कारवाई करायची ती करा, असे साळवी यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण आज (ता. 18 जानेवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरी छापा टाकला आहे. एसीबीचे काही अधिकारी साळवी यांच्या घरी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास हजर झाले आहेत. या कारवाईबाबत आता राजन साळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. परिणाम काहीही होऊ दे त्याला सामोरे जाण्याची मानसिकता आहे. राजकीय सूडाने कोणतीही कारवाई केली तर ठाकरेंची साथ सोडणार नाही. माझा माझ्या पक्षावर विश्वास आहे, असे पु्न्हा एकदा राजन साळवी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (“Whatever action is taken…”, Rajan Salvi reiterates to stay with Uddhav Thackeray)

हेही वाचा… Rajan Salvi : ठाकरे गटाला आणखी एक झटका; आमदार राजन साळवींच्या घरी लाचलुचपत विभागाचा छापा

- Advertisement -

एसीबीने राजन साळवी यांच्या तीन घरांवर छापा टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर राजन साळवी यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. अधिकारी कालपासून रत्नागिरीत आले. त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती मला मिळत होती, असे राजन साळवी यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, ज्यावेळी दीड वर्षांपूर्वी एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. तेव्हाच मला समजले होते की, यानंतरही अशा अनेक कारवाया होणार आहेत. तेव्हापासूनच मी मानसिक तयारी करून ठेवली आहे. आजपर्यंत सहावेळा चौकशी करण्यात आली आहे. मझ्यासोबतच पत्नी, दोन मुले, भाऊ, त्याची बायको आणि मुलांची याआधी चौकशी करण्यात आली आहे. पण आता मी उद्धव ठाकरेंसोबत असल्याने राजकीय सुडापोटी कारवाई करण्याच्या हेतूने ही कारवाई होत आहे. पण मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही आणि मी राजन साळवी काय आहे, हे मला स्वतःला माहिती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. याचे परिणाम काहीही होऊ देत, सामोरे जाण्याची तयारी आहे, असे साळवी यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेले. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते. एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता. तर, जी काही संपत्ती आहे ती माझ्या व्यवसायातून कमावलेली आहे, त्यामुळे दोषी आढळून अटक झाली तरी चालेल, असे साळवी यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -