कोल्हापुरात पावसाचा जोर; राधानगरीचा 6 वा दरवाजा उघडल्याने राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली

कोल्हापुरात पावसाचा जोर; राधानगरीचा 6 वा दरवाजा उघडल्याने राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली

कोल्हापूर – 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक भागात पाणी साचले असून ओढ्या नाल्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. यामुळे यंदाच्या मोसमात राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेला असून पंचगंगेची पाणीपातळी 17 फुटांवर गेली आहे. जिल्ह्याला पुढचे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विविध धरणातून विसर्ग वाढला –

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरणातून 3 हजार 28 क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू आहे. यामुळे भोगावती नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशार देण्यात आला आहे. राधानगरीशिवाय तुळशी धरणातून विसर्ग वाढला असून सध्या 8 हजार क्युसेकने विसर्ग होत आहे.

ही धरणात 100 टक्के पाणी साठा –

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून पाटगाव, कुंभी धरण पूर्ण भरले आहे. या सोबतच तुळशी, चिकोत्रा, चित्रा, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबेरी, कोदे ही धरणेही 100 टक्के भरली आहेत. दुसरीकडे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्या 52 हजार 500क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता –

राज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, कोकण या भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. घाट भागातही मुसळधार पवासाची शक्यता आहे. मान्सून अद्याप गेलेला नसून 4ते 5 दिवस सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागात ढग जमा झाले असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

First Published on: September 11, 2022 2:31 PM
Exit mobile version