सीरममध्ये या कारणामुळे आग लागली, आगीच्या भडक्यात ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे

सीरममध्ये या कारणामुळे आग लागली, आगीच्या भडक्यात ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे

पुण्याच्या मांजरी परिसरात सीरम इन्स्टिस्टुटमध्ये लागलेल्या आगीचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रोटा व्हायरस प्लॅंटचे बांधकाम सुरू असताना वेल्डिंगच्या कामादरम्यान ही आग लागल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी दिली. आज दुपारी २ वाजता लागलेल्या आगीचा भडका उडण्यासाठी इन्सुलेशन इनफ्लेमेबल मटेरिअलमुळे ही आग वाढल्याची प्राथमिक शक्यता त्यांनी व्यक्त केली. या आगीच्या भडक्याच पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

सीरम इंस्टिट्यूटमधील एम एसईझेड ३ या इमारतीत दुपारी २ वाजता आग लागली. रोटा व्हायरस प्लॅन्ट इन्स्टॉलेशनचे काम सुरू असताना वेल्डिंग स्पार्कमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्लॅंटमध्ये इन्सुलेशन इनफ्लेमेबल मटेरिअलची ज्वलनशीलता अधिक असते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच टॅंकर तसेच तीन वॉटर टॅंकर घटनास्थळी पोहचले. अवघ्या दोन तासात ही संपुर्ण आग विझवण्यात आली आहे. आग विझवल्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी आतमध्ये पाहिले तेव्हा ५ मृतदेह आढळले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनीही पाच मृतदेह सापडल्याची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या कोव्हिशिल्ड लसनिर्मितीची फॅक्टरी ही आगीच्या स्थळापासून लांब असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविशील्डच्या ठिकाणी कुठलेही नुकसान झाले नाही. या संपुर्ण घटनेची पोलिस चौकशी सुरू आहे. यापुढच्या टप्प्यात फायर ऑडिट आणि पोलिस चौकशी होईल असे टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही या संपुर्ण प्रकरणात संपुर्ण माहिती घटनास्थळावरून घेतली आहे असेही ते म्हणाले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी मृत्यूमुखी पडलेले लोक हे बांधकाम कामगार असण्याची शक्यता वर्तवली आहे.

First Published on: January 21, 2021 6:10 PM
Exit mobile version