क्षयरोगाच्या अचूक निदान व उपचारात होल जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान प्रभावी – राजेश टोपे

क्षयरोगाच्या अचूक निदान व उपचारात होल जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान प्रभावी – राजेश टोपे

क्षयरोगाच्या अचूक निदान व उपचारात होल जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान प्रभावी - राजेश टोपे

आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक अॅनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीने क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार करण्यासाठी विकसित केलेले ‘होल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान’ अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक अँनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून होल जीनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे ५०० नागरिकांचे क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार मोफत करणाऱ्या पंधरवड्याचे आयोजन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे उद्घघाटन महाराष्ट्र राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्रीमहोदय बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक अँनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या नवीन उपक्रमाचे स्वागत करतो. आताच्या काळात क्षयरोगासाठी सुसंगत रामबाण उपाय असणारे हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णाचा कुठल्या प्रकारातील क्षयरोग झाला आहे याचे तातडीने निदान होऊन त्या प्रकारातील औषधपचार करणे डॉक्टरांना सुलभ होणार आहे. हे संशोधन विकसित करणाऱ्या संशोधकांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका नवनवीन संशोधनाला वाव देण्याचे काम करीत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन झाले पाहिजे, हे केंद्र सरकार व राज्य सरकारचे धोरण आहे. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकार संपूर्ण राज्यभर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवीत असतो. क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान झाले व त्याच्यावर अचूक व वेळेत उपचार झाले तर क्षयरोगामधून पूर्णपणे रुग्ण हा बरा होतो. लालबागचा राजा या प्रकारचे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असून त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. तसेच सर्वांना चांगले आरोग्य लाभो,ही सदिच्छा व्यक्त करतो.

महापौर किशोरी पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने मृत्यूची संख्या जास्त आहे. होल जीनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे अचूक निदान व उपचार होणार असल्यामुळे रुग्ण हा तातडीने बरा होऊ शकेल. खाजगी रुग्णालयांमध्ये या तपासणीचा दर जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका तळागाळातील नागरिकांसाठी काम करणारी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये हा उपक्रम प्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येईल. त्यानंतर सहा ते आठ महिन्याच्या कालावधीनंतर नियमितपणे हा कार्यवंतीत होईल. राज्य शासनाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले काम व मुंबईकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाला थोपविणे शक्य झाले असल्याचे महापौरांनी सांगितले.

डॉ. अनिर्वाण चॅटर्जी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारण त्यावर औषधी आहे. पण त्यासाठी वेळेत, त्वरित तंतोतंत चाचणी आणि योग्य उपचार होणे हे गरजेचे आहे. याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तरच क्षयमुक्त राष्ट्र म्हणून उभारता येतं हे इंग्लंड या राष्ट्राने दाखवून दिले आहे. इंग्लंडमध्ये ज्या तपासणीच्या माध्यमातून हे शक्य झाले तीच अत्याधुनिक तपासणी पद्धत आम्ही आता मुंबईमध्ये आयआयटी, महाराष्ट्र स्टेट इंनोवेशन सोसायटी यांच्या मदतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आज उपलब्ध करून देत आहोत,याचा मला मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते हॉल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक श्री. सचिन पडवळ, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. अनिर्वाण चॅटर्जी, डॉ. अमृतराज झाडे, प्रा. किरण कोंडाबागे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी उपस्थित होते.

 

First Published on: September 15, 2021 9:21 PM
Exit mobile version