Rajya Sabha bypolls: काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Rajya Sabha bypolls: काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेत्या रजनी पाटील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी बुधवारी दुपारी १ वाजता प्रमुख नेत्यांच्या उपस्थित दाखल करणार आहेत. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. रजनी पाटील सध्या काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. आज बुधवार २२ सप्टेंबर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. रजनी पाटील विधानभवन महाराष्ट्र येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी सोमवारी रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. भाजपकडून अर्ज माघारी घेण्यात आला नाही तर संजय उपाध्याय आणि रजनी पाटील आमने – सामने असतील. भाजपकडून संजय उपाध्यायसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय उपाध्याय अर्ज दाखल करणार

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उपाध्याय उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

४ ऑक्टोबरला निवडणूक

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी खुलं मतदान असल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडे अधिक संख्याबळ आहे. यामुळे भाजप आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकते. महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले तर निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही तर ४ ऑक्टोबरला निवडणूक घेण्यात येईल. निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील सहा रिक्त जागांसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूकीची घोषणा केली. तर त्याच संध्याकाळी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील राज्यसभेवर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात या जागांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांची चढाओढ सुरु आहे.


हेही वाचा : पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत


 

First Published on: September 22, 2021 9:34 AM
Exit mobile version