Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा

Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा

मुंबई : 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. 31 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्रातूनही 6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार भाजपला 2, शिवसेनेला 1, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 1 अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज असते.

…तर संभाजीराजे निवडून येऊ शकतात

विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त असली तरी भाजपकडे 22 मतं शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्येनुसार जर संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर संभाजीराजे निवडून येऊ शकतात.

शिवसेनेकडून संजय पवार आणि चंद्रकांत खैरेंच्या नावाची चर्चा

पण शिवसेनेनं संभाजीराजेंच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम ठेवला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले जातेय. त्याचवेळी संजय राऊत यांना पक्षाकडून संभाजीराजेंना राज्यसभेच्या तिकिटाची ऑफर दिल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखून त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, असं संजय राऊत म्हणालेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडूनही कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा आहे. यासंदर्भात संजय पवार यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलीय.

शिवाजीराव आढळराव पाटील आणि उर्मिला मातोंडकर यांचीही नावे चर्चेत

माझं नाव आघाडीवर आहे, माझं नाव चर्चेत आहे हे कालपासून माध्यमातूनच मला समजलं आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आणि उर्मिला मातोंडकर यांचीही नावे चर्चेत आहेत. त्याबाबतीत माझंही नाव चर्चेत असल्याचं आता माध्यमातून मी पाहिलंय. पण वरिष्ठांकडून मला तसा सिग्नल मिळालेला नाही. तसा फोनही मला आलेला नाही. चर्चेतूनच माझं नाव पुढे आलेलं आहे, असंही कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितलं आहे.

मी तीन टर्म म्हणजेच 15 वर्षे नगरसेवक होतो : संजय पवार

शिवसेनेत 1989 म्हणजे साधारण 30 वर्षे मी काम करत आहे. शिवसेनेत अनेक चढ-उतार मी पाहिलेत. मातोश्रीला आम्ही कायम मंदिर मानलंय. आमचे मोठे साहेब आणि उद्धव साहेब दैवत म्हणून आम्ही काम करतोय. तसेच काही तरी आपल्याला मिळावं म्हणून कधीच काम केलं नाही. मी तीन टर्म म्हणजेच 15 वर्षे नगरसेवक होतो. 14 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहतोय. शहरप्रमुख म्हणून काम बघितलेलं आहे. तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलंय. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उच्च पदावर नेऊन ठेवणारा हा पक्ष आहे, असंही संजय पवारांनी म्हटलंय.

तरी हा संजय पवार त्यांच्या पाया पडतोय

साहेबांच्या डोक्यात तसं काही असल्यास ते उमेदवारी देतीलही. नाही दिलं तर शिवसैनिक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. संधी दिली तर लढायला तयारच आहोत. कायमच लढायला तयार होता. साहेबांचा आदेश हा आदेशच आहे. आपल्या पक्षात काही मागायचं नसतं, काम बघून, पक्ष बघून मातोश्री ठरवत असतं, काय द्यायचं की काय नाही द्यायचं. शिवसेनेत अशा पद्धतीने काम चालते. संभाजीराजे आमचे राजे आहेत, आदरणीय कुटुंब आहे, मी एवढा मोठा नाही. आम्हाला त्या घराबद्दल खूप आदर आहे. मोठे राजे असू देत, संभाजीराजे असू देत, मालोजीराजे असू देत किंवा त्यांचे छोटे चिरंजीव असले तरी हा संजय पवार त्यांच्या पाया पडतोय. ही शिवसैनिकांना शिकवलेली पद्धत आहे. राजेंचा अपमान माझ्याकडून व्हावा, अशी माझी कधीच अपेक्षा नाही. उमेदवारी मिळाली तर मला अत्यानंद होईल, पण शेवटी अंतिम आदेश उद्धव ठाकरेंचा आदेश असेल, असंही त्यांनी सांगितलंय.

आम्ही त्यांचा आदेश पाळणारे शिवसैनिक: खैरे

विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनीही यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया दिलीय. माझं नाव जरी चर्चेत आले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणतील ते होईल, आम्हाला काहीही हरकत नाही, आम्ही त्यांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. मी जरी शिवसेना नेता असलो तरी त्यांचा आदेश पाळणार शिवसैनिक आहे. जे करतील ते चांगलेच करतील, उद्धव ठाकरेंचा विचार हा दूरदृष्टीचा असतो. ते जे काही करतील ते होईलच, असंही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणालेत.

यूपीच्या 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 4 जुलै संपणार

देशात राज्यसभेच्या 245 जागा आहेत. त्यापैकी सध्या भाजपचे 95 राज्यसभा सदस्य आहेत, तर काँग्रेसचे 29 राज्यसभा सदस्य आहेत. राज्यसभेत उत्तर प्रदेशचे सर्वाधिक 31 सदस्य आहेत, यापैकी 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या 6-6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. बिहारमधील 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील राज्यसभेच्या 4-4 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे.


हेही वाचाः Rajya Sabha Polls: राज्यसभा निवडणुकीसाठी 15 राज्यांतील 57 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज, यूपीच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार

First Published on: May 24, 2022 12:57 PM
Exit mobile version