माढ्यातून कोण? ‘रणजितसिंह’ मोहीते पाटलांचा की नाईक निंबाळकरांचा

माढ्यातून कोण? ‘रणजितसिंह’ मोहीते पाटलांचा की नाईक निंबाळकरांचा

रणजितसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते आयात करण्याचा भाजपने सपाटा लावला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. तसेच त्यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाईल, असे खुद्द महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिन्याला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. माढ्यातून उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. मात्र आता काँग्रेसच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांची माढासाठी चर्चा होत असल्यामुळे मोहिते पाटलांच्या रणजितसिंहला काय भेटणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे. २००९ साली स्वतः शरद पवार तर २०१४ साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढाचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र यावेळी विजयसिंह यांनी स्वतःऐवजी त्यांचे चिरजिंव रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मागितली. मात्र राष्ट्रवादीने त्यांना डावलून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी देण्याची हालचाल सुरु केली. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपप्रवेश केला होता.

दुसरीकडे फलटणचे असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोनच महिन्यापूर्वी काँग्रेसने साताऱ्याचे जिल्हाध्यक्षपद दिले होते. त्यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याचे आश्वासन मिळाल्यामुळे ते भाजपप्रवेश करणार असल्याचे कळते. त्यामुळे आता रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे यांची थेट लढत होईल, असे चित्र दिसत आहे.

First Published on: March 24, 2019 3:35 PM
Exit mobile version