मोहिते पाटलांचा पत्ता कट; रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे उमेदवार

मोहिते पाटलांचा पत्ता कट; रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे उमेदवार

माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे अधिकृत उमेदवार

माढ्यातून कोणता उमेदवार द्यायचा यावर राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही मोठा खल झाला होता. काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यामुळे सुजय विखे पाटील प्रमाणे त्यांना तिकिट मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भाजपने धक्कातंत्रांचा वापर करत राष्ट्रवादीप्रमाणेच मोहिते पाटलांचा पत्ता कट केला आहे. आता काँग्रेसमधून आयात केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार असलील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपकडून आज ११ उमेदवारांची याजी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील माढा या एका जागेचा समावेश आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढातून उमेदवारी दिली असल्याचा त्यात उल्लेख आहे. नाईक निंबाळकर हे काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात नाट्यमय वळणे घेणारा मतदारसंघ म्हणून माढाकडे पाहीले जाईल. सुरुवातीला शरद पवार इथून निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच नंतर उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मोहिते पाटलांना जिल्ह्यातून विरोध होत असल्यामुळे ऐनवेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली.

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्यातील असल्यामुळे माढा मतदारसंघतील इतर पाच विधानसभा मतदारसंघावर ते कसा काय प्रभाव टाकणार? हे आता पुढील काही काळात कळेलच. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचेही नाव लोकसभेसाठी चर्चेत होते. मात्र त्यालाही उमेदवारी दिली गेली नाही. या सर्व पार्श्वभूमिवर सुभाष देशमुख नाईक निंबाळकरांना मदत करणार का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

First Published on: March 29, 2019 1:47 PM
Exit mobile version